शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये उदय सामंत यांनी चोमडेपणा करू नये; संजय राऊत यांनी सुनावले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील निवडणुकांचा काळ संपला आहे, आता पक्षबांधणीवर भर देणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये कोणीही चोमडेपणा करण्याची गरज नाही, असेही संजय राऊत यांनी सुनावले.

आजारपणानंतरचा हा आपला पहिला दौरा आहे. आपण मालेगावला जात आहोत. राजकीय लढाई म्हटल्यानंतर कोर्टबाजी होतच असते, आपण उद्या पुन्हा नाशिकमध्ये येणार आहोत. आता आगामी तीन वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे आता पक्षबांधणी आणि संघटनाबांधणीचे काम करायचे आहे, हा महाराष्ट्रासाठी पक्षाने संदेश दिला आहे. आता निवडणुकीबाबत कोणताही विचार करायचा नाही, आता फक्त पक्षबांधणीकडे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा किंवा वेगळे राहण्याचा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांच्या पक्षात काय ठरले किंवा काय ठरत होते, त्यावर आम्ही का मत व्यक्त करायचे. छगन भुजबळ यांची अनेक वर्षापासून दिल्लीत जाण्याची इच्छा आहे. त्यांनी दोनवेळा लोकसभा निवडणुका लढवल्या. शिवसेनेकडून त्यांचा भरघोस मतांनी पराभव झाला. आता ज्येष्ठांसाठी असलेले राज्यसभा हे त्यांच्यासाठी योग्य सदन आहे. राज्यसभेत शरद पवार आहेत. तसेच 92 वर्षांचे देवेगौडाही आहेत, असे त्यांनी सांगितले.

भिवंडीत भाजपा फुटली आणि त्या एका गटाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत त्यांनी सत्ता स्थापन केली. चंद्रपूरमध्ये काँग्रेस महापौर होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कोणत्याही परिस्थितीत तेथे भाजपची सत्ता येऊ नये, ही आमची इच्छा होती. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या दोन गटात मतभेद होते. त्यामुळे आमच्या लोकांना नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागले, त्याला पक्षाची मान्यता नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवकाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोघे बंधू आणि पक्षाचे नेते योग्य तो निर्णय घेतील, त्यात उदय सामंत यांच्यासारख्यांना बोलण्याची किंवा चोमडेपणा करण्याची गरज नाही. दोन्ही नेत्यांची चर्चा होईल, त्यावेळी स्वीकृत नगरसेवकाबाबतही चर्चा होईल. त्यात इतर कोणीही बोलण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे.

Comments are closed.