महापौर हा अस्सल मराठी माणूसच असेल आणि ठाकरे बंधू यांच्या आघाडीचाच असेल; संजय राऊत यांचा विश्वास

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि मनसे यांची युती आहे. आमच्यासोबत शरद पवार यांचा पक्षही आहे. काँग्रेसचे नेतेही सोबत येण्यासाठी सकरात्मक आहेत. त्यामुळे स्थानिक नेते एकमेकांशी चर्चा करत आहे. शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या पक्षाशी बोलणी सुरू आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आहोत. स्थानिक नेत्यांची याबाबत चर्चा सुरू आहे. महापौर हा अस्सल मराठी माणूसच असेल आणि ठाकरे बंधू यांच्या आघाडीचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गट पैशांची उधळपट्टी करत आहे. त्यांचे प्रत्येक नगरसेवकासाठी 10 कोटींचे बजेट ठरलेले आहे. आधी नगरसेवक फोडण्यासाठी 5 कोटी खर्च केले आणि निवडणुकीवर खर्च करत आहेत. मराठी माणूस विकला जाणार नाही. निवडणुकांवर खर्च करत आहेत पण राज्यातील शेतकऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्याला किडणी विकावी लागणे ही गंभीर बाब आहे. असे हे एक प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र, अशा अनेक घडना घडल्या असण्याची शक्यता आहे. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडणी विकावी लागते, याची सरकारला लाज वाटली पाहिजे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र आले आहेत. हे दोन्ही पक्ष भाजपसोबत गटात युतीत नाही, त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र, अजित पवार भाजपसोबत असून त्यांच्यासोबत युती करत सत्तेत आहे. त्यामुळे ते भाजपचा पराभव कसा करणार, मिंधेचा गटही भाजपसोबत आहे, ते भाजपचा पराभव कसा करणार? तसा विचार जरी त्यांनी केला, तरी ते लगेच तुरुंगात जातील. हे अमित शहा यांचे गट आहेत. ते भाजपचा पराभव कसा करणार, असा सवालही त्यांनी केला.

निवडणुकीसाठी होणारी पैशांची उधळपट्टी ही महापालिकेतून लूट केलेल्या पैशांची आहे. तसेच आता ड्रग्जमधूनही त्यांच्याकडे पैसा आला आहे. ड्रग्जचे रॅकेट कोणत्या भागात चालते, याच्यामागे कोण आहे, याची फडणवीसांनी एसआयटीकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Comments are closed.