…याचाच अर्थ त्यांना मतचोरी, फ्रॉड करायचेच आहे; संजय राऊत यांचा घणाघात

आता आपली तब्येत चांगली आहे. आपले शरीर आहे, त्यात लहानसहान बदल होत असतात, आपण आपले काम करत असतो. आता पत्रकारांशी चर्चा झाल्यांतर आज निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकारी यांची भेट घ्यायची आहे, त्याच्या तयारीसाठी आणि चर्चेसाठी शिवालय येथे जाणार आहे. त्यामुळे आम्ही तब्येतीचा कधीही बाऊ केला नाही. पक्षाचे काम पुढे नेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तसेच दुसरे एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांची भेट घेणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. गेल्या 10 वर्षांपासून देशातील निवडणूका आणि निवडणूक यंत्रणा यात फ्रॉड, फसवणूक होत आहे. महाराष्ट्रात हा अनुभव आम्ही आणि हरयाणामध्ये हा अनुभव काँग्रेसने घेतला. लोकसभा निवडणुकीत 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या, अन्यथा देशात भाजपचे सरकार आलेच नसते, असा दावाही त्यांनी केला. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान किमान 45 लाख मतं वाढली, त्याचा हिशोब देण्यास आयोग तयार नाही.

दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये जो सर्वपक्षीय मोर्चा निघाला, त्यात शिवसेना आघाडीवर होती. नाशिकमध्ये साडेतीन लाख मते डुप्लिकेट आहेत. ती आमच्या लोकांनी शोधून काढली. अनेक दुबार मतदार आहेत. ती साडेतीन लाख मतं महापालिका निवडणुकीतील 25 वार्डांमध्ये फिरवली गेली, तर निवडणुकीचा निकाल फिरतो. मात्र, याबाबत निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे फक्त एक उदाहण आहे. असेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली प्रत्येक ठिकाणी साडेतीन ते चार मतं दुबार,बोगस किंवा डुप्लिकेट आहेत. अशी लोकं दोन-तीन ठिकाणी मतदान करतात. अशा वेळी निवडणूक आयोगाने निःष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने काम करावे, ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे, असे असताना व्हीव्हीपॅट मुंबईत का नाही? असा सवालही त्यांनी केला. केंद्राने तशाप्रकारच्या मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले. याचाच अर्थ त्यांना मतचोरी, फ्रॉड करायचेच आहे, असे अनेक विषय आहेत, ते आम्हाला राज्याच्या आणि देशाच्या निवडणूक आयागासमोर मांडावे लागतील. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान ,वर्षा गायकवाड असे सर्व महत्त्वाचे नेते एकत्र येत निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहोत. निवडणुकांचा खेळ आणि विनोद त्यांनी चालवला आहे, हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत, असे ते म्हणाले.

देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला आहे. तेच मत ते चोरणार असतील, तर या निवडणुकांना काय अर्थ आहे, या निवडणुकांवर कसा विश्वास ठेवायचा? असा संतप्त सवालही त्यांनी केला. मतं अचानक कशी वाढतात, यामागे कोण आहे, कोण यात पडद्यामागून काम करतंय? इतकं बोगस मतदान या देशात या पूर्वी कधी झाले नव्हते. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका बसला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आम्हाला जागरुक राहावे लागेल, असे ते म्हणाले.

या बैठकीसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित केले आहे. त्यांच्यासोबत असलेल्यांना आम्ही पक्ष मानत नाही, त्या अमिश शहा यांच्या कंपन्या आहेत. मिंधे आणि अजित पवार यांच्या गटाला आम्ही पक्ष मानत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना निमंत्रित केले नाही. ते चोर आहेत, चोरांची चोरी पकडले जाणार असतील, तर ते कशाला येतील? असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. हा देशाच्या लोकशाहीबाबतचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे निवडणुका निःष्पक्ष आणि पारदर्शक झाल्या पाहिजेत. मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या असून त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्या लोकशाहीसाठी लढत आहेत. देशात आणि राज्यातही आम्ही लोकशाहीसाठी हुकूमशाहीविरोधात लढत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. मारिया मचाडो यांचे उदाहरण समोर ठेवले, तर नोबेल समितीला हिंदुस्थानातील किंमान 500 लोकांना पुरस्कार द्यावे लागतील, असेही ते म्हणाले. निवडणूक आयोगाकडे जाणारे शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय आहेत. त्यामुळे मनसेला विरोध होण्याचे कारण नाही. या विषयावर राजकारण होऊ नये, असे आपले मत आहे.

Comments are closed.