15 दिवसांपूर्वी मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले, आता नौटंकी का करता? संजय राऊत यांचा सवाल

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजयाचा चषक घेण्यास नकार दिला, ही नौटंकी आहे. मुळात ते सामना का खेळले, हा देशाचा सवाल आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून त्यांनी पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या रक्तांचा अपमान केला आहे, त्यामुळे हे सर्व नौटंकी असल्याचे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिला, ही नौटंकी आहे. देशाने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, ही देशातील जनतेची भावना आहे. देशातील नागरिकांनी, देशभक्तांनी हा समाना पाहिलेला नाही. अनेक ठिकाणी सामना दाखवण्याचा प्रयत्न झाला पण जनतेने तो हाणून पाडला. त्यामुळे हस्तांदोलन न करणे, चषक न स्वीकारणे, ही नौटंकी आहे, ते समाना तर खेळले ना,अशा गोष्टी करून ते देशाला मूर्ख बनवत आहेत का? त्यांना पंतप्रधानांकडून देशाला मूर्ख बनवण्याची प्रेरणा घेतली आहे का? हा ढोंगीपणा देशासमोर आला पाहिजे. आता ते विजयाची रक्कम सैन्याला देण्याची घोषणा करत आहेत, पण त्यांनी विजयाची रक्कम देण्यापेक्षा पाकिस्तानसोबत खेळवण्यात आलेल्या प्रत्येक सामन्यातील सर्व खेळाडूंची रक्कम दान करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

तुम्ही का खेळला हा आमचा प्रश्न आहे. हा हुतात्म्यांचा आणि पहलगाममध्ये मारल्या गेलेल्यांच्या रक्ताचा अपमान आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवडणुकीत सर्वजण अडकले आहेत. एकेकाळी या बोर्डात महाराष्टातील खेळाडूंचा सहभाग होता. पण जय शहा आल्यापासून क्रिकट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही, हे जाणूनबुजून होतेय का, याचा विचार करणे गरजेचे आहे.

मालिकेच्या सुरुवातीला 15 दिवसांपूर्वी, त्यांनी पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केले आणि एक फोटो काढला. मग आता ही नौटंकी कशासाठी करण्यात येत आहे. जर तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानसोबत खेळलाच नसता. त्यामुळे ही सर्व नौटंकी असून देशातील जनतेला मूर्ख बनवण्यात येत आहे., असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.