पत्रकार परिषद घेत भूमिका मांडण्याची हिंमत राहुल गांधींकडे आहे, ती पंतप्रधानांकडे नाही; संजय राऊत यांचा भीमटोला

राहुल गांधी यांच्याकडे शेकडो पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडण्याची हिंमत आहे, ती आपल्या पंतप्रधानांमध्ये नाही, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक आणि संवैधानिक पद आहे. राहुल गांधी यांच्याकडे शेकडो पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडण्याची हिंमत आहे, जी आपल्या पंतप्रधानांमध्ये नाही. पंतप्रधान मोदी यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, गेल्या 11 वर्षात एकही पत्रकार परिषद घेण्याची त्यांची हिंमत झालेली नाही. राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, असे संजय राऊत म्हणाले.
गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी पत्रकरा परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. गेल्या काही काळापासून ते निवडणूक आयोगातील भ्रष्टाचार, घोटाळे, मतचोरी आणि गैरव्यवहार उघड करत आहेत. राहुल गांधी यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत या घोटाळ्याचे अनेक पुरावे दिले आहेत. कशाप्रकारे मतदारयादीतील हजारो नावे आणि एका विशिष्ट समाजाची मते डिलीट केली जातात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. याबाबत त्यांनी पुरावे दिले आहेत. या पुराव्यानंतर भाजपची बोलती बंद होण्याची वेळ आली आहे. मात्र, भाजप हा कोडगा पक्ष असून त्यांचे राजकारण हे अशाप्रकारचे घाटाळे, चोऱ्यामाऱ्या यावरच टिकून आहे. राहुल गांधी यांनी अजून हायड्रोडन बॉम्ब टाकलेला नाही, जेव्हा हायड्रोजन बॉम्ब ते टाकतील, तेव्हा वाराणसीसह देशात हादरे बसतील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजप नवेनवे लोकं बोलण्यासाठी आणत असतात. तसेच भाजपने निवडणूक आयोगात त्यांचे प्रवक्ते ठेवले आहेत. भाजपला यात पडण्याचे कारण नाही, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासमोर प्रश्न उपस्थित केला आहे आणि निवडणूक आयोग भाजपच्या प्रवक्त्याप्रमाणे काम करतोय, हे सर्वांना माहिती आहे. उद्या कदाचित निवडणूक आय़ोगाकडून बोलण्यासाठी गौतम अडाणी पुढे येतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
Comments are closed.