मराठी माणूस न्याय हक्कांसाठी मुंबईत येणार नाही, तर काय सूरत, गुवाहाटीला जाणार? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मराठी आरक्षण आणि याबाबतच्या आंदोलनावर मत व्यक्त केले. मुंबई मराठी माणसाची राजधानी असून मराठी माणूस न्याय्य हक्कांसाठी मुंबईत येणार नाही तर काय सूरत आणि गुवाहाटीला जाणार काय? असा सवाल त्यांनी केला. या निमित्ताने मराठीची ताकद मराठीद्वेष्ट्यांना दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय्य हक्कांसाठी मुंबईत यावे लागले आहे. त्यांना आतापर्यंत फक्त आश्वासने देण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.

आपले सरकार असते तर काही दिवसात आपण यांना न्याय दिला असता, असे फडणवीस म्हणाले होते. दुसरे एक आहेत, त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आतापर्यंत या लोकांना वापरून फेकून देण्यात आले आणि वेळोवेळी त्यांच्या कोपराला गूळ लावण्यात आला. आता ही लोकं मुंबईत आली आहेत तर सरकारने त्यांच्याशी संवाद साधत त्यांना त्यांचे न्याय्य हक्क दिले पाहिजेत. आता फडणवीसांना या समाजाला न्याय्य हक्क दिले पाहिजेत, असे ते म्हणाले.

जरांगे यांच्या खाद्यांवर बंदूक ठेवत कोणीतरी राजकारण करत असल्याचा आरोपाबाबत विचारले असता ते म्हणाले की, असे राजकारण करणार कोण आहेत ते शोधा, सध्या युतीमध्ये तिन्ही पक्षांत चढाओढ सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, ते समजले पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांच्या रोख नेमका कोणाकडे आहे. तसेच बंदूक ठेवण्याची वेळच फडणवीसांना का येऊ दिली? असा सवालही त्यांनी केला. ते हा प्रश्न का सोडवत नाहीत, सत्ता आल्यानंतर आता त्यांना वर्ष होत आले आहे. सत्ता आल्यानंतर सहा महिन्यात ते प्रश्न सोडवणार होते, त्याचे काय झाले.

मनोज जरांगे आणि आंदोलकांना अनेकदा फसवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली. आरक्षण देऊ, असे खोटे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षाच काहीच झाले नाही. त्यामुळे आता सरकारनेच पुढाकार घेत हा प्रश्न सोडवायला हवा. त्यांच्याशी चर्चा करून सरकारने त्यांच्या मागण्या सजून घेत सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ, असे आश्वासन देणारे, शड्डू ठोकणारे आता कुठे गेले आहेत, ते कुठे गायब झाले आहेत, की गावाला गेले आहेत, असे सवालही त्यांनी केले. आता सरकारने हा प्रश्न सोडवायला हवा, त्यांनी इतरांशी चर्चा करण्याऐवजी थेट आंदोलकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारची टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे सरकारने वेळकाढूपणा थांबवत यातून सन्मानजनक तोडगा काढण्याची गरज आहे. आंदोलक हे दहशतवादी नाहीत. ते त्यांच्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी मुंबईत आले आहेत. सरकारने फक्त आश्वासने देत फसवणूक केली आहे. त्यामुळे विघ्नहर्त्यांनेच आपल्यावरच हे विघ्न दूर करावे, अशा अपेक्षेने गणेशोत्सवात आंदोलक मुंबईत आले असावेत, असे ते म्हणाले.

Comments are closed.