कोणाच्याही आहारावर बंदी घालण्याचा अधिकार सरकारला नाही; संजय राऊत यांनी ठणकावले

महाराष्ट्रात अनेक शाकाहारी संप्रदाय असून त्यांचा राज्याला अभिमान आहे. मात्र, देशाचे सैन्य, पोलीस दल हे शाकाहारावर चालत नसून त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो. अशाप्रकारे आदेश काढत सरकार कोणाच्याही आहारावर बंदी घालू शकत नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले. तसेच फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला असेल तर तो का घेतला, हे जनतेला पटवून द्यावे, असेही संजय राऊत म्हणाले.

आपला देश किंवा महाराष्ट्र हा अचानक आणि सहज निर्माण झालेला नाही. त्याला खूप मोठे धार्मिक अधिष्ठान देशाला आणि राज्याला लाभले आहे. अनेक संत, महात्मे, पुण्यात्मे यांच्या तपस्येतून आपले भारतवर्ष निर्माण झाले आहे. आता जे खोटे राज्य, खोटे सरकार आहे, ते लवकरच जाणार आहे. देशात आणि राज्यात बदलाची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशाची आणि राज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.

आपण हिंदुत्वाच्या प्रचाराचे काम करतो. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपण 40 वर्षे होतो. आम्ही ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार आणि प्रचार करतो. मात्र, मंदिरात आपले कमीवेळा जाणे होते. मात्र, या देवस्थानच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले की, यावेच लागते, ही या देवस्थानची ताकद आहे. देवाचे काम करणाऱ्या माणसांनी देवासारखे राहवे, म्हणजे देवाचे महात्म्य राहते. या भागातील नेते आणि जनता त्याचप्रमकारे कार्य करत आहे. बाळासाहेब थोरांतासारखा नेता या भागाला लाभला आहे. शिक्षण आणि पाणी देणारा नेता हाच खरा नेता असतो. पैसे देणारे नेते येतात आणि जातात. थोरांतासारख्या नेत्याला विधानसभेत पाठवू शकलो नाही, याची खंत असल्याचेही त्यांनी सांगितले. खऱ्या शिवसैनिकांमध्ये गद्दारांचे रक्त जाऊ देऊ नका, असे आवाहनतही त्यांनी केले.गद्दारांनी आपले सरकार पाडले, याची जाणीव ठेवा आणि गद्दाराचं रक्त खऱ्या शिवसैनिकांमध्ये जाणार नाही,याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले.

सध्या अनेक महापालिकांमध्ये प्रशासक असल्याने मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका खासगीरित्या फडणवीसांच्या ताब्यात आहेत. प्रशासक त्यांनी नेमले असून निर्णय ते घेतात. आयुक्त ते नेमतात. त्यामुळे मांसविक्रीबंदीबाबतच्या निर्णय हा सरकारचा निर्णय नाही, असे म्हणणे म्हणजे प्रशासनाबाबत कमी माहिती असणे आहे. फडणवीस राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी अशाप्रकारची फुटकळ विधाने करू नयेत. त्यांनी निर्णय घेतला असेल तर तो निर्णय का घेतला, हे लोकांना पटवून द्या. स्वातंत्र्यदिन सोहळा एक विजयोत्सव आहे. त्यासाठी उपवास करणे, कर्मकांड करणे असे प्रकार चालत नाही. अशी कर्मकांड केली असती, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले असते का? असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या प्रमुख नेत्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य, भगतसिंग यांचे साहित्य वाचावे लागेल. त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून क्रांती घडवली, असे हे आदेश काढत स्वातंत्र्य मिळालेले नाही, असेही त्यांनी ठणकावले. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय ही राज्याची परंपरा आहे. ते पंरपरेने शाकाहारी आहेत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. मात्र, आपल्या देशाचे सैन्य, पोलीस दल हे शाकाहारावर चालत नाही. त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो.अशाप्रकारे कोणाच्याही आहारावर बंदी आणली जाऊ शकत नाही.

स्थानिक स्वराज्या संस्थाच्या निवडणुकीबाबत विशेषतः मुंबईत अनेक घडामोडी घडत आहे. याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांशी दिल्लीतही चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये, ही काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाची आहे. त्यामुळे या निवडणुकांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आले असून ते घेत असलेल्या निर्णयाचे जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.