Shivsena UBT Sanjay Raut statement and MNS Sandeep Deshapande replied


मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी निवडणुकांसाठी एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार यावर अनेक तर्क-वितर्कही लावले गेले. अखेर या चर्चांना पुन्हा एकदा हवा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (24 मे) पत्रकार परिषदेत याबाबत मोठे विधान केले. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची राज ठाकरेंशी युती करण्याची ‘मनसे’ आणि ‘दिल’से तयारी असल्याचे बोलून दाखवले, असे विधान त्यांनी केले. यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. (Shivsena UBT Sanjay Raut statement and MNS Sandeep Deshapande replied)

हेही वाचा : Sanjay Raut : मनसे अन् दिलसे… ठाकरे बंधू युती होणार; थंड पडलेल्या विषयाला राऊतांनी दिली हवा 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या हेतूवर सवाल उपस्थित करत ‘आम्ही दोनदा फसलो, आत्ता तिसऱ्यांदा फसणार नाही’ असे ठणकावून सांगितले आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका डिजिटल वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी युतीसंबंधीच्या आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला होता. संदीप देशपांडे यांनी त्यांच्या या विधानाचा दाखला देत ठाकरे गटासोबत अजून कोणताही संवाद झाला नसल्याचे स्पष्ट केले. “आमच्या मनात युतीविषयी शंका आहे. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत असे बोलायचे त्याला अर्थ नाही. खरेच युती करायची असेल तर चार पाऊले पुढे आले पाहिजे.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

“मनसेतर्फे मी सांगतो की, ठाकरे गटासोबत अजून कोणताही संवाद झाला नाही. आम्ही जे काही सुरू आहे ते फक्त संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमार्फतच पाहत आहोत. आम्हाला जेव्हा युती करायची होती, तेव्हा आम्ही माणूस पाठवला होता. आमची जी इतर लोकांसोबत नाती आहेत, ती आहेत. आम्ही काहीच लपवत नाही.” असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. “हे लोक युतीची मुद्दाम हवा करतात. त्यांनी याआधीही असेच केले होते. फक्त सकारात्मक बोलून युती होत नसते. आम्ही यापूर्वी स्वतः बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवर पाठवले होते. सध्या आमच्याकडून पडद्यामागून किंवा पडद्यापुढे कोणतेही संवाद सुरू नाहीत. आम्ही सर्वांसोबत बोलतो. शरद पवारांसोबतही आम्ही बोलतो. आत्ता आम्ही जर-तरच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. त्यांनी काय तो प्रस्ताव पाठवावा. दोनदा फसल्यावर माणूस तिसऱ्यांदा फसत नाही” असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.



Source link

Comments are closed.