Shivsena UBT Tejasvi Ghosalkar meet Uddhav Thackeray


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभाप्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाआधी हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मंगळवारी (13 मे) त्यांनी राजीनामा दिला तर बुधवारी (14 मे) तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली नाराजी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या असून त्यावर काय उत्तर येते? त्यांनंतर आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे. (Shivsena UBT Tejasvi Ghosalkar meet Uddhav Thackeray)

हेही वाचा : Sanjay Raut : त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर राऊतांची स्पष्ट भूमिका 

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर माधामांशी संवाद साधताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, “मी राजीनामा पत्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिले होते. मला वाटले खालच्या पातळीला हे सर्व प्रकरण मिटवले जाईल, पण तसे झाले नाही. त्यामुळे मातोश्रीवर यावे लागले.” असे त्यांनी स्पष्ट केले. “मी माझे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आहेत. त्यावर काय उत्तर येते ते पाहू. त्यांच्या उत्तराची मी वाट बघेन. त्यानंतर मी निर्णय जाहीर करेन. मी उद्धव ठाकरेंना सर्व काही सांगितले आहे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.” असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले.

मंगळवारी तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “मी तेजस्वी घोसाळकर महिला दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पक्षप्रमुख आणि आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा, ही नम्र विनंती.” असे लिहिले होते. स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने तेजस्वी घोसाळकरांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले.



Source link

Comments are closed.