शिवशक्तीच सर्वात शक्तिशाली, आमदार चषक कबड्डीत महिला जेतेपदावर शिक्कामोर्तब; राजमाता जिजाऊची निकिता पडवळ सर्वोत्तम
शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाचे ठोके वाढवणाऱया थरारक अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघावर 32-30 असा रोमांचक विजय मिळवत आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. या विजयासह महिला कबड्डीत शिवशक्तीच ‘सर्वात शक्तिशाली’ असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
विक्रोळीतील टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगलेल्या या स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम लढतीत सुरुवातीपासूनच प्रत्येक गुणासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. शिवशक्ती विरुद्ध राजमाता जिजाऊ नव्हे मुंबई विरुद्ध पुणे असा रंगलेला हा सामना कबड्डीप्रेमींना अक्षरशः खिळवून ठेवणारा ठरला. त्याआधी उपांत्य सामन्यात शिवशक्तीच्या महिलांनी धर्मवीर कबड्डी संघाला तर राजमाता जिजाऊने डॉ. पतंगराव कदम संघावर सहज मात करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही उपांत्य लढती एकतर्फी झाल्यामुळे हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱया दर्दी कबड्डीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती, पण अंतिम सामन्यातील संघर्षाने त्याची सव्याज भरपाई केली.
राज्याच्या महिला कबड्डीतील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या संघांनी पुन्हा एकदा कबड्डीचा दम घुमवणारा खेळ केला. राजमाता जिजाऊच्या निकिता पडवळने वेगवान आणि कल्पक चढायांनी संपूर्ण सामन्यावर आपली छाप सोडली. तिच्या आक्रमक खेळामुळे पुण्याला वारंवार सामन्यात पुनरागमन करता आले, मात्र निर्णायक क्षणी शिवशक्तीच्या बचावाने बाजी पलटवली. निकिता जेतेपदापासून थोडक्यात दूर राहिली, पण सर्वोत्तम खेळाडूचा किताब आणि लाखमोलाची स्कूटर जिंकत तिने दिवस गाजवला.
पहिल्या सत्रात शुभदा खोत आणि अपेक्षा टाकळे यांच्या अचूक पकडींमुळे शिवशक्तीने 14-11 अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर रिया मडकईकर आणि शुभदाच्या चढायांनी ही आघाडी 21-12 पर्यंत वाढवली. मात्र निकिताच्या दमदार खेळामुळे राजमाता जिजाऊने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. अखेरच्या दोन मिनिटांत सामन्याने कमाल उत्पंठा गाठली. स्कोअर 29-28 असा असताना विजय कोणाचा हे स्पष्ट नव्हते. पण निर्णायक क्षणी शांतता राखत शिवशक्तीने दोन गुणांची आघाडी मिळवत 32-30 फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले. या थरारक सामन्याचे राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या जोरदार आणि जल्लोषपूर्ण शैलीत निवेदन करून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला.
बक्षीस रकमेतील वाढीमुळे अंतिम लढतीत उत्साह
क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी महिला विजेत्यांची बक्षीस रक्कम एक लाखावरून दीड लाखापर्यंत वाढवल्याने अंतिम लढत अधिक रंगतदार झाली. विजेत्या शिवशक्तीला दीड लाख रुपयांसह आमदार चषक देण्यात आला, तर उपविजेत्या राजमाता जिजाऊला पाऊण लाखाचा पुरस्कार मिळाला. मात्र त्यांच्या निकिता पडवळने स्कूटर जिंकली. सर्वोत्कृष्ट पकडपटूचा मानही त्यांच्याच ऋतुजा निगडेला मिळाला. शिवशक्तीची रिया मडकईकर सर्वोत्तम चढाईपटू ठरली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे यांच्या उपस्थितीत पार पडला.
Comments are closed.