‘हेरा फेरी 3’च्या चाहत्यांना धक्का; प्रियदर्शन करणार नाही चित्रपटाचे दिग्दर्शन
अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या गाजलेल्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत समोर आलेल्या नव्या माहितीने चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी स्पष्ट केले आहे की, दिग्दर्शक प्रियदर्शन ‘हेरा फेरी 3’ चे दिग्दर्शन करणार नाहीत.
गेल्या काही महिन्यांपासून प्रियदर्शन या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना आता स्वतः निर्मात्यांनी पूर्णविराम दिला आहे. व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत फिरोज नाडियादवाला म्हणाले, “प्रियदर्शन या प्रकल्पाचा भाग नाहीत. मात्र, चित्रपटाचे काम नियोजनानुसार सुरू असून सर्व काही योग्य दिशेने पुढे जात आहे.”
विशेष म्हणजे, 2000 साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. त्यानंतर 2006 मध्ये आलेल्या ‘फिर हेरा फेरी’चे दिग्दर्शन दिवंगत नीरज वोरा यांनी केले. ‘हेरा फेरी ३’साठी 2018 मध्ये इंद्र कुमार यांची दिग्दर्शक म्हणून घोषणा करण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी हा प्रकल्प सोडला. त्यानंतर प्रियदर्शन पुन्हा या चित्रपटाकडे परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे मूळ त्रिकूट पुन्हा एकत्र दिसणार असल्याची अपेक्षा कायम आहे. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, तसेच शूटिंग कधी सुरू होणार आणि प्रदर्शित करण्याची तारीख काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Comments are closed.