पुणे बाजार समिती संचालक मंडळाचा मनमानी कारभार, बैठकीत चर्चेविना ठरावाला मंजुरी; बेकायदेशीररित्या ३६ कोटी केले वर्ग

यशवंत सहकारी कारखाना जमीन खरेदी विक्रीसाठी केलेला सामंजस्य कराराचा मसुदा पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर न करता अथवा चर्चा न करता थेट मसुद्यास मंजुरी दिल्याचा ठराव केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर बेकायदेशीररित्या कारखान्याला ३६ कोटी वर्ग केल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. त्यामुळे संचालकांना अंधारात ठेवून बहुमताच्या जोरावर समितीचे सभापती आणि सचिव कारभार करत असल्याचे यानिमित्ताने समोर आले असून आता मनमानीला कोण चाप लावणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
बाजार समितीने आर्थिक गोत्यात आलेल्या यशवंत कारखान्याची जमीन खरेदीचा निर्णय घेतला आहे. या व्यवहारात मनमानी कारभार सुरू असून बेकायदेशीरपणे सभापती यांनी कारखान्याला कोट्यवधी रुपये वर्ग केल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत सचिव यांनी व्यवहाराचा सामंजस्य कराराचा मसुद्याला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख विषयपत्रिकेवर करत कायम ठराव केला. मात्र हा मसुदा संचालक मंडळासमोर आणलाच नाही आणि आणि यावर चर्चाच झाली नाही. असे असतानादेखील हा ठराव केल्याचा आरोप माजी सभापती दिलीप काळभोर, जेष्ठ संचालक रोहीदास उंद्रे, प्रशांत काळभोर यांनी करत याबाबत लेखी पत्र समिती आणि पणन विभागाला दिले आहे.
३६ कोटी बेकायदेशीरपणे दिले
सामंजस्य नोंदणीकृत न करता नोटराईज करून बाजार समितीने सुमारे ३६.५० कोटी रूपये कारखान्याला वर्ग केले आहेत. सदरची बाब चुकीची व बेकायदेशिर आहे. ही रक्कम वर्ग करण्यापुर्वी संचालक मंडळाचे मत घेण्यात आले नसून हेदेखील बेकायदेशिर कृत्य असल्याचा आरोप संचालकांनी केला आहे.
सचिवांचा सावध पवित्रा
संचालक मंडळासमोर सामंजस्य कराराचा मसुदा ठेवण्यात आला होता, इतकेच सांगत बाजार समितीचे सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांनी यावर जास्त बोलणे टाळले. त्याने सचिव यांच्या सावध पवित्र्यामुळे संचालक मंडळाच्या गोंधळावर शिक्कामोर्तब होत आहे.
बैठकीत सामंजस्य करारावर चर्चा करण्यात आली होती. या विषयावर सर्वाधिकार मला दिलेले होते. ठराव वाचून कायम करताना बैठकीत विषय झालेला आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांनी तो नोंदवावा. – प्रकाश जगताप, सभापती, बाजार समिती, पुणे.
संचालक मंडळाच्या बैठकीत सामंजस्य कराराचा मसुदा आलाच नाही अथवा यावर कोणतीही चर्चा झाली नाही. आजदेखील संचालकांना सामंजस्य कराराची प्रत दिली नाही. संचालक मंडळाचे मत न घेताच कारखान्याला ३६ कोटी परस्पर वर्ग केले. – रोहिदास उंद्रे, जेष्ठ संचालक, बाजार समिती, पुणे.

Comments are closed.