Asia Cup Final: फायनलपूर्वी पाकिस्तानची ही चालही फसली, बाबर आझमबाबत स्पर्धा कमिटीने घेतला मोठा निर्णय!
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आशिया कप 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. पण या फायनलपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पुन्हा एकदा निराशा ओढवली आहे.
पाकिस्तानी फलंदाज वारंवार अपयशी ठरत असल्याने पीसीबीने बाबर आझमकडे (Babar Azam) पुन्हा वळण घेतलं होतं. मात्र, स्पर्धा आयोजकांनी पाकिस्तानचा हा डाव थोपवला. खरं तर, नव्या खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने बाबर आझम आणि मोहम्मद रिजवानला आशिया कपसाठी विश्रांती दिली होती. पण भारताकडून गट-सामना आणि सुपर-4 मध्ये झालेल्या दोन पराभवानंतर तसेच सुपर-4 मधल्या अखेरच्या सामन्यातील लटपटलेल्या खेळामुळे पीसीबीला बाबरची उणीव जाणवली.
रिपोर्टनुसार, बाबर आझमचे टी20 संघात पुनरागमन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत होण्याची शक्यता आहे. आशिया कप फायनलसाठी त्याला तातडीने दुबईला बोलवण्याचा प्रस्ताव मात्र मंजूर झाला नाही. आयोजकांनी स्पष्ट केलं की, एखादा खेळाडू जखमी झाला नाही तर संघात बदल करता येणार नाही.
बाबर आझमने शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं होतं, कारण त्याचा स्ट्राइक रेट ही मुख्य कारणं मानली गेली. निवड समितीचे सदस्य आकिब जावेद आणि मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांचं मत आहे की, बाबर-रिजवानऐवजी नव्या खेळाडूंना संधी देणं योग्य आहे.
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी बाबरला परत घेण्याचे आदेश दिले होते. पण आयोजकांच्या नियमानुसार तो निर्णय लागू करता आला नाही.
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत बाबर आझम परतण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी फलंदाजांच्या सातत्याने अपयशामुळे वरिष्ठ फलंदाजाची उणीव प्रकर्षाने जाणवते आहे. आशिया कपमध्ये उरलेल्या सामन्यांतील सलमान अली आगाच्या (Salman Ali Agha) कामगिरीवर त्याच्या कर्णधारपदाचाही निर्णय अवलंबून असेल. तर मोहम्मद हारिस संघर्ष करत राहिला, तर पुन्हा विकेटकीपिंगची जबाबदारी मोहम्मद रिजवानकडे जाऊ शकते.
बाबर आझम परत आल्यानंतर तो सलामीला खेळेल की मधल्या फळीमध्ये (क्रमांक 3-4) फलंदाजी करेल, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. बाबरचा टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मात्र उत्कृष्ट आहे. त्याने पाकिस्तानसाठी खेळलेल्या 128 सामन्यांत 39.83 च्या सरासरीने आणि 129.22 च्या स्ट्राइक रेटने 4223 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तीन शतकं आणि 36 अर्धशतकं आहेत.
Comments are closed.