थोडक्यात बातम्या – सरस्वती विद्या मंदिरतर्फे उन्हाळी शिबीर, अतुलनिय कलाकारांची ’स्वरबंध’ मैफल

माहीम पश्चिम येथील सरस्वती विद्या मंदिरतर्फे 26 ते 30 एप्रिल या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे. साठवणीतील खेळ, आठवणीतील खेळ अशी शिबिराची थीम असून नव्वदच्या दशकातील रस्सीखेच, लगोरी, विटीदांडू, साखळी, पाठीवरून उडी असे खेळ खेळण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय शिबिरात शारीरिक तंदुरुस्तीचे सत्र देखील असणार आहे. पहिल्या शंभर सहभागींची नोंद स्वीकारली जाणार असून प्रवेश निशुल्क आहे.

अतुलनिय कलाकारांची ’स्वरबंध’ मैफल

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वरळीच्या नेहरू सेंटरने सांस्पृतिक क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱया कलावंतांची बहारदार मैफल आयोजित केली आहे. शुक्रवार 2 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजता ’स्वरबंध महाराष्ट्राचे’ या कार्यक्रमाचा प्रेक्षकांना आनंद केंद्राच्या नाटय़गृहात विनामूल्य घेता येईल. ज्या गायकांनी, संगीतकारांनी प्रदीर्घ प्रवासात उज्वल यश मिळवले अशा अतुलनिय कलाकारांचा हा कार्यक्रम आहे. यात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री फैय्याज शेख, ’सुनहरी यादे’ या वाद्यवृंदामुळे जगभर परिचयाच्या असलेल्या जेष्ठ गायिका प्रमिला दातार यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. संयोजन ‘मिती क्रिएशन’ यांचे असून सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत. गप्पांबरोबर संपूर्ण गीताचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी मंदार आपटे, माधुरी करमरकर या गायकांचा कार्यक्रमात सहभाग आहे.

पालखी सोहळ्यानिमित्त उद्या आढावा बैठक

साई सेवक मंडळ मुंबईच्या वतीने रविवार, 27 एप्रिलला संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2025 च्या पालखी सोहळ्यासंदर्भात पदयात्री व सदस्यांच्या सूचना व समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे मुख्य विश्वस्त विलास परळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे विश्वस्त किशोर परब यांनी कळवले आहे. ही आढावा बैठक लालबाग येथील चिवडा गल्ली येथील न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालयात होणार आहे.

Comments are closed.