पाडव्याला आंब्याचा मुहूर्त हुकणार; बाजारात हापूसचा तुटवडा, उत्पादनात 60 ते 70 टक्क्यांनी घट
तापमानात अचानक चढ-उतार, दमट वातावरण आणि थ्रिप्स तसेच तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा कोकणासह राज्यातील आंबा बागांमध्ये मोहोर टिकला नाही. यंदा मोठ्या प्रमाणावर मोहोर असूनही प्रत्यक्षात फळधारणा कमी झाल्याने उत्पादन सुमारे साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत घटल्याचा अंदाज शेतकरी, व्यापारी वर्तवत आहेत. परिणामी सध्या बाजारात हापूस आंब्याचा तुटवडा जाणवू लागला असून दरही गगनाला भिडले आहेत. गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंबा मिळणे कठीण आहे. त्यामुळे यंदा पाडव्याला केरळ, कर्नाटक आणि बाणकोट येथील आंब्यावर तहान भागवावी लागण्याची चित्र आहे.
बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा आंबा उत्पादनाला बसला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सुरुवातीला आंब्याला विक्रमी मोहोर आला होता. मात्र त्यानंतर तापमानातील अचानक चढ-उतार, दमट वातावरण आणि थ्रिप्स तसेच तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने मोहोर टिकला नाही. अनेक बागांमध्ये वांजमोहोर दिसून आला, तर कोवळ्या फळांची मोठ्या प्रमाणावर गळ झाली. त्यामुळे अपेक्षित उत्पादन न मिळता केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन हाती येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्पादनात झालेल्या मोठ्या घटीमुळे आंबा बागायतदारांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. बागांची राखण, औषध फवारणी आणि मजुरीचा खर्च वाढलेला असतानाच उत्पन्न घटल्याने बागायतदार अडचणीत आले आहेत. काही ठिकाणी खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी बागांची राखण करणारे गुरखेही यंदा ठेवले नसल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, उत्पादन घटल्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्वेâटयार्डात गेल्या वर्षी मार्चच्या दुसर्या आठवड्यात दररोज दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. मात्र यंदा सध्या केवळ १५० ते २०० पेट्यांपर्यंतच आवक मर्यादित आहे. त्यामुळे बाजारात हापूस आंब्याचा तुटवडा जाणवत असून सध्या प्रति डझन अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. आवक वाढेपर्यंत हे दर तेजीतच राहण्याची शक्यता व्यापार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हवामान बदल, थ्रिप्सचा प्रादुर्भावामुळे यंदा अनेक बागांमध्ये केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादनाची शक्यता आहे. दुसरा मोहोर कमी आला असला तरी मे महिन्यात दुसर्या मोहोराची आवक होते. त्यामुळे त्याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. सद्दस्थितीत बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे पुढील काही काळ हापूसचे दर तेजीत असतील.
– करण जाधव, रत्नागिरीचे आंब्याचे अडतदार, मार्वेटयार्ड.
हंगामाच्या सुरुवातीला आंब्याला भरपूर मोहोर आला होता. मात्र अचानक तापमान घसरून थंडी वाढल्याने फळधारणा नीट झाली नाही. या काळात तापमान २२ ते २३ अंशांदरम्यान राहिले असते तर मोहोर टिकला असता. शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक आंबा उपलब्ध होणार नाही.
– अरविंद मोरे, रत्नागिरी आंब्याचे व्यापारी, मार्वेटयार्ड.
Comments are closed.