हवाई दलात लढाऊ विमाने आणि वैमानिकांची कमतरता
114 लढाऊ विमानांचा व्यवहार प्रलंबित : तेजसचा पुरवठा 2028 पर्यंत : सरकारकडून समिती स्थापन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलात लढाऊ विमाने आणि वैमानिकांची कमतरता असल्याचे निदर्शनास आले आहे. तर सरकारसमोर 114 लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. वायुदलाने एचएएलला 83 तेजस मार्क-1ए निर्मितीचे कंत्राट दिले आहे, परंतु अमेरिकन कंपनीकडून इंजिन पुरवठ्यास विलंब होत असल्याने ही विमाने 2028 पर्यंत उपलब्ध होऊ शकतील.
वायुदलाने मागील महिन्यात दिल्लीत पार पडलेल्या वायुदल कमांडर्सच्या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना याची कल्पना दिली होती. या कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात अलिकडेच उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती वायुदलाच्या गरजा विचारात घेत जुन्या आणि नव्या प्रकल्पांवर नजर ठेवणार आहे.
समितीत संरक्षण सचिव (उत्पादन) संजीव कुमार, संरक्षण संशोधन अन् विकास संघटनेचे (डीआरडीओ) प्रमुख डॉ. समीर कामत आणि वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल टी. सिंह यांना सामील करण्यात आले आहे. समिती दोन ते तीन महिन्यांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अहवाल सोपविणार आहे.
कॅगच्या अहवालातही उल्लेख
कॅग अहवालात देखील वायुदलातील वैमानिकांच्या कमतरतेची आकडेवारी मांडण्यात आली आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये 486 वैमानिकांची कमतरता होती. 2021 च्या अखेरपर्यंत हा आकडा 596 वर पोहोचला. 2016-21 दरम्यान 222 प्रशिक्षणार्थी वैमानिकांची भरती करण्याची योजना होती, परंतु वायुदलाला हे लक्ष्य गाठता आले नाही.
एचएएलला तेजसची ऑर्डर
वायुदलाने फेब्रुवारी 2021 मध्ये 46 हजार 898 कोटी रुपयांच्या ऑर्डरद्वारे सिंगल इंजिनयुक्त 83 तेजस लढाऊ विमाने तयार करण्याचे काम हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) सोपविले आहे. परंतु अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक्सने इंजिन्सचा पुरवठा न केल्याने एचएएलला विमानांच्या निर्मितीत विलंब लागत आहे. एचएएल 2024-25 या आर्थिक वर्षात वायुदलाला 16 तेजस विमाने सोपविणार होती, परंतु आता केवळ 2-3 लढाऊ विमानेच सुपूर्द करू शकणार आहे.
राफेलचा ताफ्यात समावेश
वायुदलाकडे सध्या 4.5 जनरेशनची 36 राफेल लढाऊ विमाने आहेत, भारत सरकारने 2016 मध्ये ही विमाने फ्रान्सकडून खरेदी केली होती. राफेलला स्वत:चा वेग, शस्त्रास्त्रs वाहून नेण्याची क्षमता आणि आक्रमण क्षमतेसाठी ओळखले जाते. हे सिंगल आणि ड्युअल पर्यायांसह उपलब्ध आहे. भारताने 28 सिंगल तर 8 ड्युअल सीटर राफेल खरेदी केले आहेत. राफेलची उ•ाणकक्षा 3,700 किलोमीटर आहे. यात तीन प्रकारची क्षेपणास्त्रs तैनात केली जाऊ शकतात. आकाशातून आकाशात मारा करणारे मीटियॉर, आकाशातून जमिनीवर मारा करणारे स्कॅल्प आणि हॅमर क्षेपणास्त्र यावर तैनात करण्यात आले आहे. राफेल विमान एका मिनिटात 18 हजार मीटरची उंची गाठू शकते.
4.5 पिढीच्या लढाऊविमानांची कमतरता
वायुदलाकडे 4.5 पिढीच्या लढाऊ विमानांची कमतरता आहे. 1.25 लाख कोटी रुपयांच्या किमतीतून या पिढीच्या 114 लढाऊ विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव सरकारसमोर प्रलंबित आहे. यातील काही लढाऊ विमाने विदेशातून आणली जाणार आहेत, तर उर्वरित विमानांसाठी समिती देशातच निर्मितीची शिफारस करू शकते. सरकार ही लढाऊ विमाने चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेऊ शकते.
Comments are closed.