कोहली-रोहितच्या वनडे निवृत्ती बद्दल सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हणाले?

विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टीम इंडियाच्या (Team india) या दोन्ही दिग्गज फलंदाजांच्या वनडे करिअरवर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. विराट-रोहित 2027 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळतील की नाही, यावरही मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सगळ्या अटकळींच्या दरम्यान, टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांना जेव्हा कोहली-रोहितच्या वनडे क्रिकेटमधील भविष्याविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर दिले. दादाच्या मते, जो चांगले खेळेल त्याला संधी मिळायला हवी.

एग्री बिझनेस लिमिटेडच्या कार्यक्रमात बोलताना सौरव गांगुली म्हणाले, हे सांगणे खूप कठीण आहे. जो चांगले खेळेल तो खेळेल. जर कोहली-रोहित चांगले खेळत असतील, तर त्यांनी खेळत राहायला हवे. कोहली आणि रोहित शर्माचा वनडे रेकॉर्ड अप्रतिम आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोघांनीही जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच, विराट आणि रोहित शेवटचे टीम इंडियाच्या जर्सीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाली.

विराट कोहलीचा रेकॉर्ड गेल्या तीन वर्षांत वनडे क्रिकेटमध्ये अप्रतिम राहिला आहे. 2023 मध्ये किंग कोहलीने एकूण 27 वनडे सामने खेळले. या काळात त्याने 72 च्या दमदार सरासरीने 1377 धावा केल्या. विराटने 6 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली. 2024 मध्ये कोहलीला फक्त 3 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 58 धावा केल्या. 2025 मध्ये मात्र कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतला. या वर्षी आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांत त्याने 45 च्या शानदार सरासरीने 275 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतके समाविष्ट आहेत.

वनडे फॉरमॅटची गोष्ट निघाल्यावर रोहित शर्मा देखील कुणापेक्षा कमी नाही. यंदा ‘हिटमॅन’ने आतापर्यंत 8 सामने खेळले असून, 37 च्या चांगल्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. 2024 मध्ये खेळलेल्या 3 वनडे सामन्यांत भारतीय कर्णधाराने 52 च्या सरासरीने 157 धावा केल्या होत्या. तर 2023 मध्ये रोहितने 26 डावांत 52 च्या सरासरीने 1255 धावा फटकावल्या होत्या. हे आकडे सांगत आहेत की, वनडेमध्ये रोहित-कोहलीचे वर्चस्व अजूनही कायम आहे. या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाला अजूनही या दोन्ही दिग्गज फलंदाजांची सख्त गरज आहे.

Comments are closed.