Navratri 2025 – तुळजापूरात नवरात्रौत्सवाला उत्साहात सुरुवात

आई राजा उदे उदे…चा जागर, संभळाचा निनाद, शेकडो किलो फुलांचा वापर करुन मंदिरात केलेली आकर्षक फुलांची सुजावट, मंत्रोच्चार अशा भक्तीमय व हर्षोउल्हासाच्या वातावरणात आज (22 सप्टेंबर 2025) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ करण्यात आला.
श्री. तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरुवात झाली. पहाटे पारंपरिक विधीनुसार देवीची मंचकी निद्रा संपवून श्री. देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी तथा श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते मंत्रोच्चार, पारंपरिक वाद्यांचा गजरात घटस्थापना विधी पार पडला. प्रथमता कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ कुंड येथून तीन घट कलशात तीर्थ भरून धार्मिक मंत्रोच्चारात धार्मिक पुजा करण्यात आली. यानंतर पहिला घट कलश श्री. तुळजाभवानीदेवीच्या सिंह गाभार्यात घटस्थापना करण्यात आली दुसरा घट कलश यमाई देवी मंदिरात तर तीसरा घट कलश आदिमाया आदिशक्ती मातंगी देवीच्या मंदिरासह परिसरातील मंदिरात घटस्थापना करण्यात आली. श्री. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तीन घट कलशाची स्थापना करण्यात येते, श्री आई अंबाबाई देवी त्रिगरूगात्मक स्वरूपनी असल्याने तीन घट कलशाची स्थापना करण्यात येते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र तुळजापूरनगरीत महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती दर्शवली. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन, पोलीस, नगरपरिषद, महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम व राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रे, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि वाहतुकीवर विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर श्री. तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर सजावटीसाठी सुमारे अडीच टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेवंती गुलाब झेंडू ऑर्किड यासह विविध फुलांचा वापर करून मंदिर सजविण्यात आले आहे.
घटस्थापनेचे धार्मिक महत्व
सिंहाच्या गाभार्यात देवींजींच्या डाव्या बाजूला घट बसवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या जमिनीतील ‘वावरी’ माती घटस्थापनेसाठी आणली जाते. परंपरेनुसार तुळजापूरातील धाकटे कुंभार कुटुंबीयांकडून घट कलश येतो, ज्यात गोमुख व कल्लोळ तीर्थाचे पाणी भरलेले असते. तसेच शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य अर्पण केले जाते. जिल्हाधिकार्यांच्या हस्ते घट प्रतिष्ठापित केला जातो आणि देवीची पहिली माळ (नागवेलीच्या पानांची) अर्पण केली जाते.
Comments are closed.