टीम इंडियाच्या LIVE मॅचमध्ये मोठा अनर्थ! श्रेयंका पाटील स्ट्रेचरवर न्यावं लागलं बाहेर; नेमकं का

श्रेयंका पाटील जखमी बातम्या : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 (ICC Women’s T20 World Cup 2026) मध्ये भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ग्रुप-ए मधील नेदरलँड्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताची फिरकीपटू श्रेयंका पाटील दुखापतग्रस्त झाली. स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करत असताना तिचा पायाला दुखापत झाली, त्यामुळे तिला मैदानाबाहेर जावे लागले. तिची दुखापत इतकी गंभीर होती की तिला चालताही येत नव्हते, शेवटी स्ट्रेचरवरून (बुग्गी रुग्णवाहिका) तिला मैदानाबाहेर नेण्यात आले. गेल्या वर्षभरात भारतीय संघासाठी तिने अष्टपैलू कामगिरी केली असल्याने, तिचे दुखापतग्रस्त होणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नेमकी कशी झाली दुखापत?

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात श्रेयंका पाटील 6 वे षटक टाकण्यासाठी आली होती. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नेदरलँड्सची फलंदाज फीबे हिने मिडविकेटच्या दिशेने शॉट मारला. हा चेंडू अडवण्यासाठी श्रेयंकाने धाव घेतली, मात्र चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात तिचा पाय घसरला आणि ती पडली. त्यानंतर श्रेयंका प्रचंड वेदनेने विव्हळताना दिसली आणि तिला साधे उभे राहणेही कठीण झाले होते. मैदानाबाहेरून तातडीने बुग्गी रुग्णवाहिकाला पाचारण करण्यात आले आणि तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावरून श्रेयंकाच्या दुखापतीबाबत अपडेट जारी करत, ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

भारतीय महिला संघाने रचला इतिहास

एकीकडे श्रेयंकाच्या दुखापतीमुळे चिंता असताना, दुसरीकडे भारतीय फलंदाजांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी करत इतिहास रचला. नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 20 षटकांत तब्बल 209 धावांचा डोंगर उभा केला. महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे, महिला टी-20 विश्वचषकात भारताने पहिल्यांदाच 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताची सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी मैदानावर वादळी फलंदाजी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोन्ही खेळाडूंनी शानदार अर्धशतके झळकावून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.

हे ही वाचा –

Ind vs Afg 2nd ODI : एकाच दिवसात भारताने अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा लोळावलं; टीम इंडियाचा 170 धावांनी दणदणीत विजय, मालिकाही खिशात!

Comments are closed.