नाव घेणार नाही पण…, श्रेयस अय्यरने ‘या’ खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून

रवी बिश्नोईवर श्रेयस अय्यर इंग्लंड T20I पराभवासाठी : टी-20 वर्ल्ड कप 2026 नंतर चॅम्पियन भारतीय संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. आयर्लंडविरुद्धच्या 2-0 अशा पराभवानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात 191 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना भारतीय संघ सातत्याने सामन्यात टिकून होता. परंतु, रवी बिश्नोईच्या एकाच ओव्हरने संपूर्ण सामन्याचे चित्र बदलून टाकले. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनेही याच ओव्हरला सामन्याचा टर्निंग पॉईंट मानले आहे. याशिवाय त्याने वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूवरही आपले मत मांडले.

सामना कुठे निसटला? श्रेयस अय्यरने सांगितले कारण

कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवानंतर स्पष्ट केले की, 15 व्या ओव्हरपर्यंत भारतीय संघ सामन्यात चांगल्या स्थितीत होता. परंतु, बिश्नोईच्या 17 व्या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा आल्या आणि तिथूनच सामना पूर्णपणे भारताच्या हातातून गेला. अय्यर म्हणाला की, “मला ठाऊक आहे की सामना कुठे बिघडला, पण मला कोणत्याही एका विशिष्ट खेळाडूचे नाव घ्यायचे नाही. 15 व्या ओव्हरनंतर सामना आमच्या हातातून निसटला. जेव्हा एक नो-बॉल पडला, तेव्हा मला वाटले होते की रवी (बिश्नोई) कमबॅक करेल. पण 17 व्या ओव्हरने सामन्याची दिशाच बदलून टाकली. त्याला या चुकीतून शिकावे लागेल.”

सॅम करन आणि जेकब बेथेलचे कौतुक

इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या जेकब बेथेल (नाबाद 75 धावा) आणि सॅम करन (4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स) यांचे श्रेयस अय्यरने तोंडभरून कौतुक केले. जेकब बेथेलने ज्या प्रकारे भारतीय गोलंदाजांचा सामना केला, ते खरोखरच कौतुकास्पद होते. सॅम करनने सुरुवातीलाच खेळपट्टीचा अंदाज अचूक बांधला होता. त्याने आमच्या डाव्या हाताच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. आमचे फलंदाज लेग साईडला मजबूत आहेत, पण करनने त्यांना तिथे फटके मारण्याची संधीच दिली नाही.

युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीबद्दल मोठे वक्तव्य

या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे. त्याने आपल्या पहिल्या डावात 10 चेंडूत 14 धावा केल्या. वैभवच्या डेब्यूबाबत बोलताना श्रेयस म्हणाला की, “वैभवमध्ये कधीही न घाबरणारी वृत्ती आहे. त्याला मैदानावर खेळताना पाहणे खरोखरच अप्रतिम आहे. तो दडपणाखाली येईल अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती. गेल्या काही महिन्यांत आणि वर्षांत त्याने जबरदस्त क्रिकेट खेळले आहे. त्याने या मोठ्या संधीचे सोने करत उत्कृष्ट खेळ दाखवला, जो पाहणे आम्हा सर्वांसाठी खूप आनंददायी होते.”

हे ही वाचा –

Ind vs Eng 2nd T20 : संजू सॅमसन संघातून डच्चू, कोपऱ्यात तोंड पाडून उभा होता, तितक्यात मागून गौतम गंभीर आला अन्… कॅमेऱ्यासमोर नेमकं काय घडलं? पाहा Video

Comments are closed.