श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत, बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर

अ‍ॅलेक्स केरीचा झेल घेताना मागे धावत जात श्रेस अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवर अप्रतिम कॅच पकडला. परंतु, तो झेल घेत असताना त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाल्याचे दिसून आले. रिपोर्ट्सनुसार, अय्यर ड्रेसिंग रूममध्ये बेशुद्ध पडला आणि त्याची अवस्था अत्यंत निराशाजनक झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

“श्रेयस अय्यरच्या डाव्या बाजूच्या खालच्या बरगडीच्या भागाला तीव्र दुखापत झाली आहे… पुढील तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. स्कॅनमध्ये त्याच्या प्लीहा (spleen) मध्ये चिरा झाल्याचे आढळले आहे. सध्या तो उपचाराखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो हळूहळू बरा होत आहे,” असं बीसीसीआयने सोमवारी (27 ऑक्टोबर 2025) रोजी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांच्या सल्लामसलतीनंतर बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय संघाचा डॉक्टर सिडनीमध्ये श्रेयसबरोबर राहून त्याच्या दैनंदिन प्रकृतीचा आढावा घेणार आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

31 वर्षीय श्रेयस अय्यर पुढील 2 ते 7 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. सुरुवातीला श्रेयस अय्यर तीन आठवड्यांसाठी खेळापासून दूर राहील, असा अंदाज होता. मात्र, आता त्याचा पुनर्वसनाचा कालावधी आणखी वाढू शकतो. भारतात परतण्यापूर्वी तो किमान एक आठवडा सिडनीतील रुग्णालयात राहण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर सध्या भारताच्या टी-20 संघाचा भाग नाही.

Comments are closed.