श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा, कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली महत्त्वाची माहिती

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे लढतीत हिंदुस्थानचा स्टार खेळाडू आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर जायबंदी झाला होता. त्याच्यावर गेल्या तीन दिवसांपासून ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तीन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर आज श्रेयस अय्यरला नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने ही माहिती दिली आहे.

”श्रेयस अय्यरला आयसीयूतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याची प्रकृती सुधारत असून आता तो सर्वांशी बोलत आहेत. पुढील काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. मी त्याच्याविषयी फिजीओकडून माहिती घेतली आहे. देवाच्या कृपेने आता सर्व काही ठीक आहे”, असे सूर्यकुमारने सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 34 वे षटक हर्षित राणा टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर अॅलेक्स कॅरी याने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने बॅटची कड घेतली आणि उंच उडाला. याचवेळी बॅकवर्ड पॉइंटच्या मागून धावत आलेल्या श्रेयस अय्यर याने सूर मारून झेल पकडला. हा झेल घेताना तो पोटावर आदळला. यामुळे त्याला दुखापत झाली. तीव्र वेदनेने तो कळवळू लागला. अय्यरने झेल घेतल्याने कॅरी 24 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर अय्यरलाही मैदान सोडावे लागले.

Comments are closed.