श्रेयस अय्यरचे वडील संतापले! आशिया कप वरून झाला मोठा वाद
आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यावेळी आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) 19 ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली. मात्र भारताच्या 15 सदस्यीय संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेले नाही. याच गोष्टीवरून श्रेयसचे वडील संतोष अय्यर यांनी बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
श्रेयस अय्यर यांचे वडील संतोष अय्यर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “मला कळत नाही की भारताच्या टी-20 संघात स्थान मिळवण्यासाठी श्रेयसने आणखी काय करायला हवे. दिल्ली कॅपिटल्सपासून कोलकाता नाईट रायडर्स आणि केकेआरपासून पंजाब किंग्सपर्यंत अय्यर दरवर्षी आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आहे.” पुढे बोलताना श्रेयसचे वडील म्हणाले, “त्याने 2024 मध्ये कर्णधार म्हणून केकेआरला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आणि 2025 मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.”
संतोष अय्यर यांनी बीसीसीआयवर निशाणा साधत पुढे सांगितले, “मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवा, पण निदान त्याची निवड तरी संघात करा.” श्रेयसबद्दल बोलताना संतोष अय्यर म्हणाले, “तो नेहमी एकच गोष्ट सांगतो, हे माझं नशीब आहे, यात आपण काही करू शकत नाही. तो नेहमी शांत राहतो. तो कधीच कुणावर आरोप करत नाही, पण आतून तो खूप निराश आहे.”
श्रेयस अय्यरची कामगिरी आयपीएल 2025 मध्ये अतिशय शानदार झाली होती. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने तब्बल 11 वर्षांनी आयपीएल प्लेऑफसाठी पात्रता मिळवली. कर्णधार म्हणून उत्तम नेतृत्व करताना अय्यरने फलंदाजीतही चमक दाखवली आणि 17 सामन्यांत 50.33 च्या सरासरीने 604 धावा केल्या. आयपीएलच्या 18व्या हंगामात अय्यरची सर्वोत्तम खेळी नाबाद 97 धावांची होती. या हंगामात तो पाच वेळा नाबाद राहिला होता.
Comments are closed.