श्री विठ्ठलाची पाद्यपूजा 21 ते 31 डिसेंबर या काळात राहणार बंद, जाणून घ्या कारण
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा सेवा 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी घेतला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा करण्यास वारकरी जास्त प्राधान्य देतात. या पूजेद्वारे भक्तांना श्री विठ्ठलाच्या चरणांना स्पर्श करण्याचा लाभ मिळतो. ही एक विशेष चरणस्पर्श दर्शनपूजा आहे. तसेच मंदिरात दिवसभरात अनेक अर्चनपूजा (तुळशीपूजा) होतात. यामध्ये ठराविक भाविकांना प्रवेश दिला जातो. यापूजेवेळी दर्शन थांबविण्यात येते.
पाद्यपूजा ही मंदिरातील खास सेवांपैकी एक असून, पाच भाविकांच्या गटासाठी पाच हजार रुपये देणगी आकारून ही पूजा केली जाते. मागील काही दिवसांपासून पाद्यपूजेसाठी मोठय़ा प्रमाणात नोंदणी होत असल्याने गर्दीचाही ओघ वाढत आहे. भाविकांना पाद्यपूजेमुळे मुख्य दर्शनरांगेत विलंब होत होता. गर्दीचे व्यवस्थापन करताना अडचणी निर्माण होत होत्या. भाविकांना मुखदर्शन, पदस्पर्श दर्शन सुलभ व सुरळीत व्हावे, या उद्देशाने पाद्यपूजा डिसेंबरअखेरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल मंदिर समितीचे नित्योपचार विभागप्रमुख संजय कोकिळ यांनी दिली.
Comments are closed.