थरारक विजयांसह श्रीराम बाद फेरीत, यंग भारत कबड्डी
श्रीराम विश्वस्त मंडळाने आज झालेल्या दोन्ही सामन्यात पिछाडीवर असूनही शेवटच्या क्षणी जोरदार खेळ करत बाजी मारली आणि यंग भारत सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी कुमार गट कबड्डी स्पर्धेची सर्वप्रथम बाद फेरी गाठली. तसेच स्वामी समर्थ, स्वस्तिक क्रीडा मंडळाने आपल्या विजयी सलामी दिली.
प्रभादेवीत गेले पाऊण शतक कबड्डीची परंपरा जपणाऱया यंग भारत सेवा मंडळाच्या कबड्डीच्या दुसऱ्या दिवशीही थरारक कबड्डीची मेजवानी प्रभादेवीकरांना अनुभवायला मिळाली. श्रीराम मंडळ हा यश क्रीडा मंडळाविरुद्धच्या सामन्यात मध्यंतराला 11-16 ने पिछाडीवर होता. पण शेवटच्या क्षणी अंतिम सिंग आणि हर्ष काळे यांनी वेगवान खेळ करत यशला अपयशाच्या दरीत ढकलत सामन्यावर 35-31 अशी आपल्या विजयाची मोहोर उमटवली. दुसरा सामनाही श्वास रोखणारा ठरला. यातही श्रीराम इच्छाशक्तीविरुद्ध 14-20 असा मागे होता, पण उत्तरार्धात त्यांच्या खेळाडूंनी झपाटल्यासारखा खेळ करत 39-34 अशी बाजी मारली. आज झालेल्या अन्य लढतीत स्वामी समर्थने हीड इंडियाचा 42-32 असा तर स्वस्तिक क्रीडा मंडळाने सिद्धीप्रभाचा 54-17 असा धुव्वा उडवला.
Comments are closed.