नोंद – अचूक मार्गदर्शन
>> शुभांगी बागडे
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे मुख्य गमक आहे ते नियोजन आणि अभ्यासासाठी योग्य पुस्तकांचा वापर. परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध असलेल्या विपुल साधनसामग्रीतून योग्य पुस्तकांची निवड करणं काहीसं कठीणच. नेट-सेट परीक्षेची तयार करणाऱया परीक्षार्थींना उपयोगी पडेल असे पुस्तक साहित्य – पेपर – 1 व मराठी साहित्य या दोनही विषयांवर आधारित मार्गदर्शक संच अश्वराज अॅकेडमीद्वारे प्रकाशित झाला आहे. नेट-सेट नेव्हिगेटर पेपर – 1 आणि नेट-सेट नेव्हिगेटर पेपर 2 – मराठी साहित्य अशी शीर्षके असलेले हे संच मराठी साहित्य-भाषेच्या अभ्यासक अश्विनी जाधव – बडदरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहेत. या दोनही संचात रचनात्मक पद्धतीने मांडणी करीत माहिती दिलेली आहे.
स्पर्धा परीक्षांची बरीच पुस्तके बोजड मांडणीची दिसून येतात. मात्र ही दोनही पुस्तके याबाबत अपवाद ठरली आहेत. पुस्तकांची एकूण मांडणी सचित्र असल्याने चित्रदर्शी परिणाम होतो. मुद्देसूद, क्रमानुसार विषय मांडला गेल्याने कमी वेळेत विषयाची उजळणी करता येणे शक्य आहे. यामुळे सविस्तर उजळणी करता येते. प्रत्येक पाठ सविस्तर स्वरूपात क्रमानुसार देत शेवटी त्या प्रश्नोत्तरे अशी सुटसुटीत मांडणी आहे.
नेट-सेट, टीइटी या तीनही परीक्षांसाठी उपयोगी पडणारी अशी पुस्तके आहेत. पेपर-1 मधील विषय सर्वांसाठी अवश्यक असल्याने तशा स्वरूपातच विषय व प्रश्नोत्तरे दिली आहेत. या विषयातील तज्ञांनी याची मांडणी केली असल्याने परीक्षार्थींना नक्कीच फायेदशीर ठरेल. याबाबत विशेष दखल घ्यायला हवी ती मराठी भाषा आणि साहित्य या विषयाच्या पुस्तकाची. शंभर पानी पुस्तकात मराठी साहित्यातील सर्व संदर्भ, माहिती दिली आहे. भाषा, तिचे स्वरूप, भाषाविज्ञान, संस्कृती संकल्पना, साहित्यशास्त्र, विविध साहित्य प्रवाह, निवडक साहित्यकृती अशा सर्व विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक आहे.
केवळ परीक्षार्थीच नव्हे तर या शाखेचा अभ्यास करणाऱया प्रत्येकाने आवर्जून संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. यात माहितीचे विश्लेषणही सोप्या व नेमक्या स्वरूपात केले आहे. जसे लेखक, कवी यांची टोपणनावे, साहित्यकृतींची कालानुक्रमानुसार यादी, यासाठी लागणार्या अचूक संदर्भांची माहिती देण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी टिपा नोंदवण्याकरिता रिकामी जागादेखील सोडली आहे. एकूणात हे पुस्तक योग्य माहितीपुस्तिका अशा स्वरूपाचे ठरले आहे.
परीक्षेचा मुख्य अभ्यासक्रम लक्षात ठेवून ही पुस्तकमालिका तयार केली आहे. विषयाला अनुसरून अधिकाधिक तपशिलांसह निगडीत संकल्पना उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या पुस्तकांत केला गेल्याचे लक्षात येते. यात सुरुवातीलाच संपूर्ण अभ्यासक्रम नोंदवला आहे ज्यायोगे माहिती पुस्तिका म्हणूनही हे पुस्तक योग्य ठरते. पुस्तकात विविध संकल्पना सुस्पष्ट व्हाव्यात याकरिता विविध तक्ते, आकृत्या यांचा योग्य ठिकाणी वापर केला आहे. मार्गदर्शक व लेखिका अश्विनी जाधव – बडदरे यांनी विषयाचा आवाका लक्षात घेऊन केलेली मांडणी व अचूक माहिती मार्गदर्शक ठरणारी आहे.
नेट-सेट नेव्हिगेटर पेपर – 1
नेट-सेट नेव्हिगेटर पेपर 2 – मराठी साहित्य
प्रकाशक ः अश्वराज अॅकेडमी
रिव्हल्स: अश्विनी जाधव – बडरे
मूल्य ः प्रत्येकी 599/-
Comments are closed.