दिवाळी विशेष – सांगीतिक अनुबंधाची दिवाळी

जयतीर्थ मेवुंडी, वैज्ञानिक संगीत गान्सेस
दिवाळी पहाट ही संकल्पना कर्नाटकात नाही. त्यामुळे पहिल्यांदा अनुभवलेला कार्यक्रम अविस्मरणीय होता. सगळीकडे प्रज्वलित केलेले दीप, छान सजून, तयार होऊन येणारे रसिक, त्या प्रसन्न वातावरणाची सुंदर लय आणि या लयीत सादर होणारे शास्त्रीय संगीताच़े, भक्ती संगीताचे गायन. हे सारं अलौकिक वाटणारं आहे. रियाज, पहाटेचे कार्यक्रम शास्त्रीय गायकांसाठी नवे नाहीत. परंतु दिवाळी पहाटच्या गायनासाठी ब्राम्ह मुहूर्तावर लागलेली संगीतसाधना कोणत्याही गायकासाठी पारलौकिक अनुभव देणारी असते.
?गायकाला त्याच्यातील कलाकार म्हणून व्यक्त होण्यासाठी दिवाळी सणाचे औचित्य खरोखर वेगळे म्हणायला हवे. दिवाळी प्रकाशाचा उत्सव. आपला मुख्य सण. या सणांत शास्त्रीय संगीत अंतर्भूत होणं ही रसिकश्रोत्यांची वेगळी दाद आहे. छान ठेवणीतले पोशाख घालून नटून, सजून आलेले श्रोते मनमोकळा संवाद साधतात, दिवाळी शुभेच्छा आणि सोबत फराळ, गोडधोड देतात. कोणत्याही कलाकाराला या अभिष्टचिंतनाचे अप्रूप वाटावे असेच आहे हे. दिवाळी पहाट हा केवळ सण नसून ती सांस्कृतिक देवाणघेवाण आहे आणि हे चित्र केवळ महाराष्ट्रात दिसते. दिवाळीचा हा खरा आत्मीय स्वर संगीतसाधनेमुळे साध्य करता येतो याचाही वेगळा आनंद असतो. माझ्यासारख्या गायकाला सांगीतिक अनुबंधाची वाटते. संगीत ही माझ्यासाठी पूजा आहे. त्यात समर्पण भावना आहे जी माझी गुरू, माझ्या आईकडून मिळाली आहे. या समर्पण वृत्तीतून माझ्याकडून त्या बंदिश रचणं सुरू झालं, दिवाळीनिमित्त मी काही बंदिश रचलेल्या आहेत. ‘़शुभ प्रभात शुभ दिपावली, दीप जलाओ शुभ दीपावली’ ही भटियार रागातील एक बंदिश पूर्णरंग नावाने रचली आहे.
दिवाळीचा खरा संस्कार म्हणजे दीप जेव्हा आपण प्रज्वलित करतो याचा अर्थ आपला अंधारातून प्रकाशाकडे, सकारात्मकतेकडे प्रवास सुरू होतो. देवाने तुम्हाला जे सुरांचे देणे बहाल केले आहे, त्याचा अधिक शोध घेत ती संगीतसाधना देवाला आणि रसिकश्रोत्याला समर्पित करा. प्रकाशाचा हा दुवा सुरांनी जोडण्याची ही साधना कायम असेल.
शब्दांकन : शुभांगी बागडे
Comments are closed.