शुभमन गिलचं वादळ! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना तोडलं, फोडलं अन् रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला
शुबमन गिल सेंचुरी इंड. वि वा 2 रा कसोटी सामना: भारत आणि वेस्टइंडीज (India vs West Indies 2nd Test Day 2) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी कॅरिबियन गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले. या सामन्यात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) 175 धावांची दमदार खेळी खेळली, तर त्याच्या पाठोपाठ आता कर्णधार शुभमन गिलनेही (Shubman Gill) शानदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दहावे शतक पूर्ण केले. भारताने पहिली डाव 5 बाद 518 धावा करत घोषित केली. गिल 196 चेंडूंमध्ये 129 धावा करून नाबाद राहिला.
शुभमन गिलची शानदार शतकी खेळी, एका वर्षात 5 कसोटी शतके
वेस्टइंडीजविरुद्ध गिलने जबरदस्त फलंदाजी करत 177 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार होता. शुभमन गिलच्या नावावर आता कसोटीत एकूण 10 शतके जमा झाली आहेत. या शतकासह गिलने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. शुभमन गिलने या कॅलेंडर वर्षातच 5 शतके झळकावली आहेत. वेस्टइंडीजविरुद्ध हे गिलचे पहिले कसोटी शतक आहे. एका वर्षात 5 कसोटी शतके झळकावण्याचा पराक्रम भारतीय संघासाठी आतापर्यंत फक्त विराट कोहलीने (2013 आणि 2017) केला होता.
रोहित शर्माचा विक्रम मोडला, कर्णधार म्हणून अनोखा पराक्रम
गिलने या शतकासह रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये रोहितच्या नावावर 9 कसोटी शतके होती, पण आता गिलने आपले 10वे शतक झळकावत हा विक्रम तोडला. यासोबतच त्याने 9 शतके करणाऱ्या हॅरी ब्रूकलाही मागे टाकले आहे. तर कर्णधार म्हणून खेळलेल्या 12 डावांमध्ये गिलचे हे 5वे शतक आहे. या यादीत फक्त एलेस्टेअर कुक (9 डाव) आणि सुनील गावसकर (10 डाव) यांनीच गिलपेक्षा जलद गतीने पाच शतके पूर्ण केली आहेत.
टीम इंडियाने 518 धावांवर डाव केला घोषित! यशस्वीनंतर गिलनेही ठोकले शतक
दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने पाच बाद 518 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि यशस्वी जैस्वालनंतर कर्णधार शुभमन गिलनेही शतक झळकावले. गिल 129 धावांवर नाबाद राहिला. ध्रुव जुरेलच्या रूपात भारताने पाचवी विकेट गमावताच संघाने डाव घोषित केला. भारताकडून यशस्वीने सर्वाधिक 175 धावा केल्या.
भारताने दुसऱ्या दिवशी 2 बाद 318 धावांवर सुरुवात केली, परंतु यशस्वी लवकर आऊट झाला, ज्यामुळे त्याचे द्विशतक हुकले. त्यानंतर गिलने नितीश रेड्डीसोबत चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. नितीश त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 43 धावांवर बाद झाला. त्यानंतर गिलने गियर बदलले आणि वेगाने खेळण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात त्याने त्याचे 10 वे कसोटी शतक पूर्ण केले. जुरेल देखील अर्धशतकाच्या जवळ होता, पण 44 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने तीन, तर रोस्टन चेसने एक विकेट घेतली.
आणखी वाचा
Comments are closed.