गिल युगाची दमदार सुरुवात! गावस्करचा विक्रम गाठून इतिहास रचला

शुबमन गिलला अनेक वर्षांपासून चाहत्यांनी, तज्ज्ञांनी आणि माध्यमांनी “भारतीय क्रिकेटचा प्रिन्स” म्हटले होते. पण आता वेळ आली आहे त्याला “किंग” म्हणून ओळखण्याची. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर गिलच्या खांद्यावर कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आणि त्याने ती संधी सुवर्णात बदलली.

इंग्लंडसारख्या कठीण दौऱ्यावर गिलने आपल्या नेतृत्वगुणांची छाप उमठवली. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत, एजबॅस्टनवर गिलने इतिहास रचला. केवळ इंग्लंडच्या बालेकिल्ल्यावर विजय मिळवून दिला नाही, तर महान सुनील गावस्कर यांचा 49 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. गिल आता विदेशात सर्वात कमी वयात कसोटी सामना जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

6 जुलै 2025 रोजी, गिलने 25 वर्षे आणि 301 दिवसांच्या वयात इंग्लंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. सुनील गावस्कर यांनी 1976 मध्ये 26 वर्षे आणि 202 दिवसांच्या वयात न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड कसोटीमध्ये विजय मिळवला होता.

या विजयाने भारताने परदेशात सर्वात मोठ्या धावांच्या फरकाने कसोटी सामना जिंकण्याचा विक्रमही केला. याआधी 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 318 धावांचा विजय हा सर्वोत्तम होता, पण आता एजबॅस्टनचा हा 336 धावांचा विजय सर्वोच्च ठरला आहे.

पहिल्या कसोटीत लीड्समध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरी कसोटी एजबॅस्टनमध्ये खेळवण्यात आली होती, जिथे भारताने आजवर कधीही इंग्लंडला हरवले नव्हते.

इंग्लंडने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने शुबमन गिलच्या ऐतिहासिक 269 धावा, रविंद्र जडेजाच्या 89 आणि यशस्वी जायस्वालच्या 87 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 587 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 407 धावा केल्या, त्यामुळे भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.

दुसऱ्या डावात गिलने पुन्हा जबरदस्त फलंदाजी करत 161 धावा केल्या आणि भारताने 6 बाद 427 धावा करून डाव घोषित केला. इंग्लंडसमोर 608 धावांचे आव्हान ठेवण्यात आले, पण त्यांची दुसरी डाव 271 धावांत संपुष्टात आली. या सामन्यात भारतासाठी आकाश दीपने सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या तर मोहम्मद सिराजने 7 बळी टिपले.

Comments are closed.