आता हे खेळाडूही खेळणार देशांतर्गत क्रिकेट; या दिवशी मैदानात उतरतील शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय झाले आहेत. बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले होते की आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंनाही किमान दोन विजय हजारे ट्रॉफी सामने खेळणे बंधनकारक असेल. काही खेळाडूंनी ही अट पूर्ण केली असून आता उर्वरित खेळाडू मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाचे वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल लवकरच विजय हजारे ट्रॉफीत खेळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजालाही या स्पर्धेत सहभाग घ्यावा लागणार आहे.
शुबमन गिलने अद्याप विजय हजारे ट्रॉफीतील एकही सामना खेळलेला नाही. तो पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मिळालेल्या माहितीनुसार गिल 3 आणि 6 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हे सामने सिक्कीम आणि गोवा संघांविरुद्ध असू शकतात. क्रिकबजच्या वृत्तानुसार गिलने आपल्या राज्य क्रिकेट संघटनेला उपलब्धतेबाबत कळवले असून, न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी तो हे सामने खेळणार आहे.
रवींद्र जडेजा सौराष्ट्र संघाकडून खेळतो. तो 6 आणि 8 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे. या काळात सौराष्ट्रचे सामने सर्व्हिसेस आणि गुजरात संघांविरुद्ध असतील. त्याचप्रमाणे केएल राहुल कर्नाटक संघाकडून खेळतो. राहुलने अद्याप नेमकी तारीख जाहीर केलेली नसली तरी 3 आणि 6 जानेवारी रोजी तो त्रिपुरा आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्यांत खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भारतीय संघातील मोठ्या खेळाडूंमध्ये केवळ जसप्रीत बुमराहलाच विजय हजारे ट्रॉफीपासून दूर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआय त्याचा वर्कलोड मॅनेज करत असून, तो न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. उर्वरित सर्व खेळाडूंना किमान दोन विजय हजारे सामने खेळणे आवश्यक आहे. भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जायसवालने आज बुधवारी आपला पहिला सामना खेळला असून, त्याला अजून किमान एक सामना खेळावा लागणार आहे.
Comments are closed.