टी20 वर्ल्ड कप हुकला तरी शुभमन गिल ठरला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’; बीसीसीआयने केला गौरव

भारतीय कसोटी आणि एकदिवसीय (ODI) संघाचा कर्णधार शुभमन गिल याला मानाच्या पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रविवारी, १५ मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ‘BCCI नमन अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात शुभमन गिलची पुरुष गटात ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू’ (Best International Cricketer of the Year) म्हणून निवड करण्यात आली. दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला BCCI ची ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू’ म्हणून गौरवण्यात आले.

​शुभमन गिलसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत शानदार ठरले, विशेषतः कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आपली छाप पाडली. टी-२० क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे त्याला टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या संघात स्थान मिळवता आले नाही, मात्र कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी अत्यंत प्रभावी होती. इंग्लंड दौऱ्यावरील १० कसोटी डावांमध्ये त्याने ७५.४० च्या सरासरीने ७५४ धावा कुटल्या, ज्यामध्ये ४ शतकांचा समावेश होता. कर्णधार म्हणून गिलची ही पहिलीच कसोटी मालिका होती.

​भारताने जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या विजयातही शुभमन गिलचे मोठे योगदान होते. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती आणि त्यावेळी तो जगातील नंबर-१ एकदिवसीय फलंदाज होता. संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने एकूण १८८ धावा केल्या होत्या.

​२०२६ सालाची सुरुवात मात्र त्याच्यासाठी निराशाजनक राहिली. तो टी-२० संघाचा उपकर्णधार होता, पण खराब फॉर्ममुळे त्याला केवळ संघातून डच्चूच मिळाला नाही, तर टी-२० वर्ल्ड कपलाही मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने t20 विश्वचषक 2026 चे जेतेपद पटकावले. फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.

Comments are closed.