भारत वि इंग्लंड: शुबमन गिल नवा कर्नाधर
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी इंग्लंड दौऱयासाठी शनिवारी हिंदुस्थानच्या कसोटी संघाची घोषणा केली. शुभमन गिलकडे या संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले असून, तोच रोहित शर्माचा नवा वारसदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आऊट ऑफ फॉर्म असलेल्या ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचबरोबर करुण नायरचे तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.
रोहित शर्मा व विराट कोहली या स्टार खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने इंग्लंड दौऱयावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलच्या नेतृत्वाची खरी ‘कसोटी’ लागणार आहे. ऋषभ पंत फॉर्मात नसला तरी परदेशात टीम इंडिया संकटात असताना याच पंतने संकटमोचकाची भूमिका चोखपणे बजावली होती. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱयावर त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. साई सुदर्शन व नितीश कुमार रेड्डी यांचीही संघात वर्णी लागली आहे. जसप्रीत बुमरासह मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप व अर्शदीप सिंह या वेगवान गोलंदाजीचा ताफा टीम इंडियाच्या दिमतीला असेल. रवींद्र जाडेजा व वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलू खेळाडूंवर फिरकीची गोलंदाजीची धुरा असेल.
शमी, सरफराजचा पत्ता कट
‘टीम इंडिया’चा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘टीम इंडिया’च्या कसोटी संघात असलेला सरफराज खान यांचा इंग्लंड दौऱयातून पत्ता कट करण्यात आला आहे. शमीला दुखापतीमुळे वगळले की, कसोटी संघाचे दार त्याच्यासाठी कायमचे बंद झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. दुसरीकडे सरफराज खानने दहा किलो वजन घटविले. शिवाय, त्याने मायदेशात संधी मिळताच गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी शतक झळकवण्याचा पराक्रमही केला होता. मात्र, प्रतिभावान फलंदाजाची इंग्लंड दौऱयासाठी कसोटी संघात वर्णी लागू शकली नाही.
इंग्लंड दौऱयासाठी हिंदुस्थानी संघ ः शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
हिंदुस्थान विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी 20 ते 24 जून हेडिंग्ले, लिड्स
- दुसरी कसोटी 02 ते 06 जुलै एजबॅस्टन, बार्ंमगहॅम
- तिसरी कसोटी 10-14 जुलै लॉर्डस्, लंडन
- चौथी कसोटी 23 ते 27 जुलै ओल्ड ट्रफर्ड, मँचेस्टर
- पाचवी कसोटी 31 जुलै ते 04 ऑगस्ट द ओव्हल, लंडन
संघात गुजरातचा भरणा महाराष्ट्राचा एकच खेळाडू
हिंदुस्थानी क्रिकेटला सर्वाधिक स्टार खेळाडू देणाऱया मुंबईसह महाराष्ट्रातील केवळ शार्दुल ठाकूर या एका खेळाडूची हिंदुस्थानी संघात वर्णी लागली. हिंदुस्थानच्या कसोटी संघावर नजर फिरविल्यास या संघात गुजरात टायटन्स संघाचे वर्चस्व असल्याचे सहज लक्षात येते. या संघातील तब्बल पाच खेळाडूंची ‘टीम इंडिया’त वर्णी लागली आहे. कर्णधार बदलला की संघात कसा बदल होतो याचे हे उत्तम उदाहरण होय. गुजरात टायटन्स संघातील प्रसिध कृष्णा, साई सुदर्शन, शुभमन गिल, मोहम्मद सिराज व वॉशिंग्टन सुंदर या पाच खेळाडूंची कसोटी संघात निवड झाली आहे.
Comments are closed.