टी20 वर्ल्ड कप विजयानंतर वादात अडकला शुबमन गिल, संजू सॅमसनच्या फोटोला केलं एडिट?

भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. तिसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्याने संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे, मात्र सोशल मीडियावर एक वाद निर्माण झाला आहे आणि त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. हा वाद भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिलच्या एका पोस्टबद्दल सुरू झाला आहे. टी२० विश्वचषक जिंकल्यावर अनेकांनी भारताचे फोटो पोस्ट करत संघाचे अभिनंदन केले, यामध्ये गिलचाही समावेश आहे. त्याची ही पोस्ट पाहून काहींनी त्याच्यावर संजू सॅमसनला मुद्दाम फोटोमधून हटवले म्हणजे एडिट केल्याचा आरोप लावला आहे.
गिलने इंस्टाग्रामवर भारतीय संघाचा टी२० चषक जिंकलेल्या सेलिब्रेशनचा फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये संजू दिसत नाही. अनेक चाहत्यांनी भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या पोस्टसोबत गिलने शेयर केलेल्या फोटोची तुलना केली. सूर्यकुमारच्या पोस्टमध्ये संजू मागे उभे राहिलेला दिसत आहे. यामुळे गिलने त्याची पोस्ट करण्याआधी फोटो एडिट केला असे अनेकांनी त्याच्यावर आरोप लावले आहेत. त्यावर अनेकांनी गिल संजूच्या यशावर जळत आहे, अशाही प्रतिक्रीया दिल्या आहेत.
संजूने टी२० विश्वचषक २०२६ मध्ये उत्तम कामगिरी केली. त्याला सुरुवातीला संधी नाही मिळाली, मात्र नंतर महत्वाच्या सामन्यात तो भारताच्या अंतिम अकरामध्ये परतला. त्याने ५ सामन्यात ३२१ धावा केल्या आणि या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला. दुसरीकडे गिल टी२० विश्वचषकाच्या संघात जागा बनवू शकला नाही. त्याला खराब फॉर्ममुळे संघातून वगळले होते.
गिलच्या पोस्टबाबत पाहिले तर भारताने जेव्हा टी२० विश्वचषक जिंकला तेव्हा अनेक फोटो काढले गेले. ते वेगवेगळ्या ऍंगलने क्लिक केले असून गिलने जो फोटो पोस्ट केला त्यामध्ये मागे उभे असलेले काही खेळाडूंची पोजीशन बदलेली असल्याने संजू नीट दिसत नाही.
यशस्वी जायसवालने देखील असाच फोटो पोस्ट केला आहे. तसेच शिवम दुबे आणि आर अश्विन यांनीही याच फोटोचा वापर केला आहे. सूर्यकुमारने जो फोटो पोस्ट केला तो वेगळ्या ऍंगलने काढलेला आहे, ज्यामध्ये संजू जसप्रीत बुमराहच्या मागे दिसतो.
या स्पर्धेत संजूने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात आणि न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात ८९ धावा केल्या होत्या. तसेच त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सुपर-८ सामन्यात नाबाद ९७ धावा केल्या होत्या.
Comments are closed.