क्रिकेटनामा – शुभमनची कसोटी!

>> संजय करहाडे

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या बडय़ा फलंदाजांना सावत्र मुलांसारखी वागणूक दिली जाण्याच्या चर्चा ऐरणीवर असताना विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत फारसा कुणाला रस असेल असं वाटत नाही. तरीही वादविवादाने तापलेल्या वातावरणात कसोटी मात्र खेळली जाणार आहे दिल्लीच्या गारठय़ात!

आजपासून माझं लक्ष अगदी बारकाईने शुभमनच्या कामगिरीकडे असेल. तो तरुण आहे, यशस्वी आहे, इंग्लंडमधल्या जबरदस्त कामगिरीचा मालक आहे इत्यादी सर्व खरं. पण काहीच दिवसांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वन डे मालिकेत तो कप्तानही असणार आहे आणि ती मालिका अन् ‘रो-को’ संबंधित सध्या उडालेली राळ त्याला नक्कीच भांबावून गेली असणार. त्याने प्रत्यक्षपणे भोवतालच्या चर्चासत्रात भाग जरी घेतला नाही तरी त्याच्या स्वतःच्या डोक्यात अनेक शक्यतांची धुमश्चक्री उडालीच असेल. आतापर्यंत शुभमनची निग्रही वृत्ती आपल्याला पाहायला मिळालेली असली तरी असा वादंग त्याने प्रथमच ऐकलेला असावा. त्यावर मात करणं कठीण असेल. ही त्याची एक आगळी कसोटीच म्हणा!

‘रो-को’ अतिशय व्यावसायिक खेळाडू आहेत. कप्तान कुणीही असलं तरी ते देशासाठी खेळणार असल्याची दोघांनाही चांगली कल्पना आहे यात वाद नाही. ‘को रो’च्या अधिपत्याखाली खेळलेला आहे. ‘रो’ तर जगनमित्र! तरीही ऑस्ट्रेलिया दौऱयावर त्यांच्या धावा होण्या-न होण्यावर बऱयाच भावना अवलंबून असतील याचं अनुमान शुभमन, ‘रो-को’, गंभीर आणि आगरकरला नक्कीच असेल. या अन् अशा विस्कळीत मनःस्थितीमध्ये शुभमनचा कस पणाला लागेल.

हिंदुस्थानी संघात काही बदल? सर्वसाधारणपणे संघात बदल संभवत नाही, पण कुणा एखाद्याचं वर्पलोड,कुणा एखाद्या राणाला संधी इत्यादी सबबीवर बदल नाकारता येणार नाही!

यशस्वी, साईला शतकाची संधी आहे. राहुल, जुरेलचे हात सरसावत असतीलच. जडेजाला कसोटीत चार हजार धावा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱया दहा धावा करण्याची उत्कंठा असेल! तर गेल्या वर्षी न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत 3-0 असा मार खाल्लेल्या संघ व्यवस्थापनाला विंडीजवर 2-0 असा विजय मिळवण्याची घाई!

Comments are closed.