कर्णधार शुबमन गिल WTC मध्ये इतिहास रचणार? बाबर आजमला मागे टाकण्याची संधी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात भारताचा सलामीवीर आणि सध्याचा कसोटी कर्णधार शुबमन गिल भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. गिलने अलिकडच्या काही वर्षांत कसोटी स्वरूपात सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र एकूण WTC लिस्टमध्ये तो सध्या 10व्या क्रमांकावर आहे. येत्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गिलची नजर मोठ्या विक्रमावर असेल आणि तो पाकिस्तानी स्टार बाबर आजमचा विक्रम मागे टाकण्याच्या तयारीत आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आजम हा WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज आहे. बाबरच्या नावावर WTC मध्ये एकूण 3129 धावा नोंद आहेत. तो या यादीत 7व्या क्रमांकावर आहे. दीर्घकाळ टिकून फलंदाजी करण्याची क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि दबावाखाली खेळण्याची कला यामुळे त्याने हा विक्रम साधला आहे. त्यामुळे शुबमन गिलसमोर बाबर आजमची बरोबरी किंवा त्याला मागे टाकणे ही आव्हानात्मक बाब ठरणार आहे.
गिलच्या नावावर सध्या WTC मध्ये 39 कसोटी सामन्यांत 2839 धावा नोंद आहेत. म्हणजेच बाबर आजमच्या तुलनेत गिल 290 धावांनी मागे आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा महत्त्वाचा मानला जातो आणि या मालिकेत भारताला दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत शुभमन गिलला किमान 4 डाव मिळण्याची शक्यता आहे. त्याने जर या मालिकेत सलग आणि ठाम कामगिरी केली, तर तो एशियाई फलंदाजांमध्ये WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा नंबर-1 खेळाडू बनू शकतो.
WTC इतिहासातील सर्वांत यशस्वी फलंदाजाचा मान इंग्लंडच्या जो रूटकडे आहे. त्याच्या नावावर तब्बल 6080 धावा नोंद आहेत आणि या स्पर्धेत 5000 धावांचा टप्पा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार टेस्ट बॅटर स्टीव्ह स्मिथ हा 4278 धावांसह जो रूटनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
शुभमन गिलसाठी ही मालिका केवळ धावांचा किंवा विक्रमांचा प्रश्न नसून नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. बाबर आजमला मागे टाकत एशियातील सर्वोच्च WTC धावपटू बनण्याची संधी आता त्याच्यासमोर उभी आहे. आता पाहायचे एवढेच की दक्षिण आफ्रिकेतील या कठीण वातावरणात गिल बॅटने कशा प्रकारे उत्तर देतो.
Comments are closed.