WTCमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर शुबमन गिल; असा दुर्मिळ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज शुबमन गिल 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मैदानात उतरणार आहे. या मालिकेत गिल एका मोठ्या विक्रमावर लक्ष केंद्रित करेल. श्रीलंकेविरुद्ध केवळ 157 धावा करून तो अशी कामगिरी करू शकतो, जी आजवर कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमलेली नाही.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ही कसोटी मालिका WTC 2025-27 चक्राचा भाग आहे. मालिकेतील पहिली कसोटी 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान गॅले येथे खेळवली जाईल, तर दुसरी कसोटी 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथे होईल.
शुबमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. जर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आणखी 157 धावा केल्या, तर WTC च्या इतिहासात 3000 धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल.
आतापर्यंत, गिलने WTC मध्ये 40 कसोटी सामन्यांच्या 73 डावांमध्ये 43.07 च्या सरासरीने 2843 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 10 शतके आणि 8 अर्धशतके असून त्याची सर्वोच्च धावसंख्या 269 धावा इतकी आहे.
WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
शुभमन गिल – 40 सामन्यांत 2843 धावा
रिषभ पंत – 40 सामन्यांत 2780 धावा
रोहित शर्मा – 40 सामन्यांत 2716 धावा
विराट कोहली – 46 सामन्यांत 2617 धावा
रवींद्र जडेजा – 48 सामन्यांत 2610 धावा
WTC च्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याच्या नावावर आहे. रूटने आतापर्यंत 77 WTC सामन्यांमध्ये तब्बल 6651 धावा केल्या आहेत.
गिलकडे आणखी एक मोठा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. एकाच WTC सायकलमध्ये 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरू शकतो. सध्याच्या WTC 2025-27 सायकलमध्ये, भारतीय संघाचे नेतृत्व करताना गिलने 8 सामन्यांत 950 धावा केल्या आहेत.
आतापर्यंत अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी एकाच WTC सायकलमध्ये 1000 हून अधिक धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत गिलला या यादीत सामील होण्याची संधी आहे.
त्यामुळे, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका शुबमन गिलसाठी केवळ कर्णधार म्हणून नाही, तर वैयक्तिक विक्रमांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची ठरेल. 157 धावा केल्यास, गिल WTC मध्ये एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करेल.
Comments are closed.