अंबरनाथमध्ये प्रस्तावित कचरा प्रकल्पाविरोधात स्वाक्षरी मोहीम; नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अंबरनाथमध्ये उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रकल्पाविरोधात नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. प्रस्तावित असलेल्या या कचरा प्रकल्पाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि अंबरनाथ बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने बुधवारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. अंबरनाथवासीयांनी एकजूट दाखवत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार ‘नाही, असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिला.

अंबरनाथ शहरात प्रस्तावित बायो मेडिकल कचरा प्रकल्प झाल्यास अंबरनाथचे पर्यावरण धोक्यात येणार असून नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पुढील पिढीच्या भविष्यास गंभीर धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पार पडलेल्या मोहिमेत शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवत प्रकल्पाला विरोध केला. शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या लढ्याला अंबरनाथकरांनी बळ देत या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. यावेळी अंबरनाथ बचाव संयुक्त कृती समितीचे उपाध्यक्ष विलास आंग्रे, अनिकेत गायकवाड आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

पुनर्विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन
या प्रकल्पाविरोधात अंबरनाथकरांनी एकजूट दाखवली आहे. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी या प्रकल्पाचा तत्काळ पुनर्विचार करावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला.

ही केवळ सुरुवात आहे. अंबरनाथच्या आरोग्याशी आणि भावी पिढीच्या भविष्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या हक्कासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल.
– अनिल भोईर (कल्याण उपजिल्हाप्रमुख)

Comments are closed.