भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या बदलाचे संकेत; A+ श्रेणी रद्द होणार? पाहा काय आहे कारण

बीसीसीआय (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा बदल होण्याच्या तयारीत आहे. बोर्ड आता सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधील ‘A+’ श्रेणी काढून टाकण्याचे नियोजन करत आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आगामी रिटेनरशिप सायकलसाठी (कराराचा पुढील कालावधी) A+ श्रेणी हटवण्याबाबत भाष्य केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वीच अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने A+ श्रेणी काढून टाकण्याबाबत चर्चा केली होती.

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार, A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये दिले जातात. ‘A’ श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, ‘B’ श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी, तर ‘C’ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपये बोर्डाकडून मिळतात.

मात्र, आता बोर्ड ही A+ श्रेणी संपवणार आहे, कारण सध्या खेळाचे तिन्ही फॉरमॅट (कसोटी, वनडे, टी-20) खेळणारे पुरेसे क्रिकेटपटू उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे, कारण हे दोन्ही खेळाडू सध्या A+ श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत.

स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, देवजीत सैकिया म्हणाले की, “आम्ही एक श्रेणी (A+) हटवत आहोत, कारण जे खेळाडू या श्रेणीसाठी पात्र होते, ते आता तिन्ही फॉरमॅटपैकी फक्त एकाच फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. आम्ही A+ श्रेणीसाठी पात्र ठरण्यासाठी जे निकष ठरवले आहेत, ते आता पूर्ण होत नाहीत. गेल्या हंगामात A+ श्रेणीत केवळ रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा होते; आणि आता बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो सर्व फॉरमॅटमध्ये खेळतो.”

Comments are closed.