पाकिस्तानचा बांगलादेश दौरा संकटात? युद्धजन्य परिस्थितीमुळे वनडे मालिका रद्द होण्याची शक्यता

टी-20 विश्वचषक 2026 (icc T20 international world cup 2026) मधून बाहेर पडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला बांगलादेशचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून, त्याची सुरुवात 11 मार्चपासून होणार आहे. नियमानुसार पाकिस्तानला 9 मार्च रोजी बांगलादेशात पोहोचायचे होते, परंतु आता या मालिकेवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. सध्याची परिस्थिती पाहता ही मालिका रद्द होऊ शकते.

इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या जागतिक राजकीय तणावामुळे (Geopolitical Tension) बांगलादेशच्या आगामी घरगुती मालिकेवर धोक्याची घंटा वाजली आहे. या मालिकेतील तिन्ही सामने 11, 13 आणि 15 मार्च रोजी ‘शेर-ए-बांंगला नॅशनल क्रिकेट स्टेडियम’वर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर बांगलादेशची त्यांच्या मायदेशातील ही पहिलीच मालिका असेल. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी तयारीची मोठी संधी आहे.

पाकिस्तानचे माध्यम ‘जिओ सुपर’ने 1 मार्च रोजी दिलेल्या माहितीनुसार, प्रादेशिक तणावामुळे या दौऱ्यावर संकट आले आहे. पीसीबी (PCB) अधिकाऱ्यांच्या मते, जर प्रवासादरम्यान कोणताही धोका नसेल किंवा सुरक्षेची चिंता नसेल, तरच हा दौरा पार पडेल. दुसरीकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) स्पष्ट केले आहे की, त्यांना मालिका रद्द करण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानकडून अद्याप कोणताही अधिकृत पत्रव्यवहार झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

बीसीसी क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष नजमुल आबेदीन म्हणाले की, पीसीबीच्या नियोजनात बदल झाल्याची कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. जर अशी परिस्थिती निर्माण झाली की ते प्रवास करू शकत नाहीत, तर आम्ही काहीही करू शकत नाही. परंतु अद्याप आम्हाला पीसीबीकडून कोणतेही पत्र मिळालेले नाही, असे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, बांगलादेश वेळापत्रकानुसार मालिका आयोजित करण्यास पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये सहभाग घेतला नव्हता, तर पाकिस्तानचा संघ सुपर-8 फेरीतूनच बाहेर पडला होता.

Comments are closed.