विराट-सूर्यकुमारला मागे टाकत सिकंदर रझाची विजयी दौड, टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात फलंदाजीने नव्हे तर गोलंदाजीने कहर केला. रझाने पाहुण्या संघाला फक्त 80 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 षटकांच्या कोट्यात फक्त 11 धावा देऊन 3 महत्त्वाचे बळी घेतले, ज्यात कर्णधार चारिथ अस्लंकाचा बळीही होता. झिम्बाब्वेने दुसरा टी20 सामना 5 विकेट्सने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सिकंदर रझाने झिम्बाब्वेच्या विजयाचा नायक म्हणून कामगिरी केली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जिंकताच रझाने विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर आघाडी घेतली.
सिकंदर रझाने आता टी20 सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव सारख्या प्रसिद्ध खेळाडूंना मागे टाकले आहे. रझाच्या कारकिर्दीतील हा 17वा सामनावीर पुरस्कार होता. तो कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू बनला आहे.
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी त्यांच्या कारकिर्दीत 16वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. कोहलीने या फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे, तर सूर्यकुमार यादव अजूनही या शर्यतीत आहेत.
या यादीत पहिल्या क्रमांकावर मलेशियाचा विरनदीप सिंग आहे, ज्याने टी20 मध्ये 22 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
टी20 मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे खेळाडू-
विरनदीप सिंग- 22
सिकंदर रझा- 17
विराट कोहली- 16
सूर्यकुमार यादव- 16
मोहम्मद नबी- 14
नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर, श्रीलंकेचा संघ फक्त 80 धावांवर गारद झाला. फक्त दोन फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कामिल मेंडिस 20 धावांसह संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रझा व्यतिरिक्त, ब्रॅड इव्हान्सने झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत कहर केला त्यानेही 3 बळी घेतले. झिम्बाब्वेने 81 धावांचे लक्ष्य 14.2 षटकांत 5 गडी बाद करत पूर्ण केले. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 7 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
Comments are closed.