शीख समुदायाने राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
सज्जन कुमार यांना ‘नायक’ संबोधल्याने संताप : माफीची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1984 च्या शीखविरोधी दंगलीतील शीख नेते आणि पीडित कुटुंबांच्या सदस्यांनी शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या दिल्लीतील घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी घोषणाबाजी करतानाच पुतळ्याचे दहनही केले. काँग्रेसचे दिवंगत नेते सज्जन कुमार यांना ‘नायक’ आणि आदर्श म्हणणाऱ्या काही काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आंदोलकांनी काँग्रेसकडून माफीची मागणी केली. शनिवारी सकाळीच आंदोलक राहुल गांधी यांच्या 5, सुनहरी बाग रोड येथील घराबाहेर जमले होते. शीख समुदायाच्या या आंदोलनावेळी पोलिसांनी परिसराला कडक बॅरिकेड्स लावले होते.
सज्जन कुमार यांना 1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. गुरुवारी दिल्लीच्या तिहार तुरुंगात वयाच्या 80 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा यांनी सज्जन कुमार यांच्या निधनाला कधीही भरून न येणारे नुकसान म्हटले होते. दरम्यान, काँग्रेस नेते उदित राज यांनी त्यांच्या मृत्यूला पक्षाचे मोठे नुकसान म्हटले होते. काँग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे शीख समाजात संतापाची लाट उसळली आहे.
स्पष्टीकरण आणि माफीची मागणी
राहुल गांधी यांच्या निवासासमोरील आंदोलनाचे नेतृत्व दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरमीत सिंग कालका आणि सरचिटणीस जगदीप सिंग काहलॉन यांनी केले. याप्रसंगी त्यांनी दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या सज्जन कुमार यांना ‘नायक’ ठरवले जात असल्याबद्दल आक्षेप घेत स्पष्टीकरण मागितले. सज्जन कुमार यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेत्यांनी त्यांना आपला नायक संबोधणारी केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह आहेत. सज्जन कुमार हे त्यांचे नायक आहेत की नाही, यावर राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. काँग्रेस नेत्यांच्या दाव्यांमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी चूक मान्य करून माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
Comments are closed.