चांदीने प्रथमच किलोमागे दोन लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे.
7,300 रुपयांनी वाढ झाल्याने दराने गाठला विक्रमी माइलस्टोन : सोने दराचीही उच्चांकी पातळीवर झेप,9 महिन्यात 1 लाखांवरून 2 लाखांवर झेप,50 हजार ते 1 लाख होण्यासाठी 14 वर्षे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चांदीच्या दराने बुधवार, 17 डिसेंबर रोजी प्रथमच 2 लाख रुपये प्रतिकिलो दराचा टप्पा पार केला. अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील मजबूत मागणीमुळे प्रथमच राष्ट्रीय राजधानीत चांदीच्या किमतीत 7,300 रुपयांनी वाढ झाल्यामुळे 2 लाख रुपये प्रति किलोग्रॅमचा विक्रम केला. सध्याच्या किमतीसह चांदी आता सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. चांदीचा भाव बुधवारी सर्व करांसह 2,05,800 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. यापूर्वी तो 1,98,500 रुपये प्रतिकिलोग्रॅमपर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे, स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव 600 रुपयांनी वाढून 1,36,500 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. सोन्याचा हा दर मंगळवारी 1,35,900 रुपये प्रतितोळा इतक्या दरावर बंद झाला होता. सध्या सोने दरानेही सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 18 मार्च 2025 रोजी चांदीचा भाव प्रथमच 1 लाख रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच चांदीला 1 लाख ते 2 लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 9 महिने लागले. तर 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी 14 वर्षे लागली. चालू वर्षात सोने 60,500 रुपयांनी तर चांदी 1,14,000 रुपयांनी महागली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,000 रुपये प्रतितोळा होता. हा दर आता 1,36,500 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात चांदीच्या भावातही 1,14,000 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी एक किलो चांदीची किंमत 86,000 रुपये होती. हा दर आता 2,00,000 रुपये प्रतिकिलोच्या पुढे पोहोचला आहे.
चांदीच्या दरवाढीची कारणे
- औद्योगिक मागणी : सोलर, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्हीमधील वापरामुळे चांदी आता केवळ दागिनेच नव्हे तर एक आवश्यक कच्चा माल बनला आहे.
- ट्रम्पची टॅरिफ भीती : अमेरिकन कंपन्या चांदीचा प्रचंड साठा जमा करत आहेत. जागतिक पुरवठा कमी झाल्यामुळे किमती वाढल्या.
- उत्पादकांमधील स्पर्धा : उत्पादन थांबण्याच्या भीतीने प्रत्येकजण आगाऊ खरेदी करत असल्यामुळे येत्या काही महिन्यांतही वेग जास्त राहील.
- चांदीमधील गुंतवणूक : गुंतवणूकदार सिल्वर ईटीएफद्वारे चांदीमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे मागणी वाढत आहे.
Comments are closed.