Sindhudurg News – मुंबई-गोवा महामार्गावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील एका वळणावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलर महामार्गाच्या बाजूच्या जंगलात जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात कासार्डे ब्राम्हणवाडीनजीक मेढेदेव येथे शनिवारी (15 मार्च 2025) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर येथून एकाच कंपनीत काम करणारे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मिळून 18 जण सिंधुदुर्ग व गोवा पर्यटनासाठी जात होते. कासार्डे ब्राम्हणवाडीनजीक मेढेदेव येथील वळणावर त्यांची ट्रॅव्हलर आली असता चालकाला डुलकी आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रॅव्हलर सरळ गोव्याच्या दिशेने जात असताना दुभाजक व मुंबईकडे जाणारा लेन पार करीत सरळ तीस ते चाळीस फूट महामार्गालगत असणाऱ्या जंगलात जाऊन आदळली. या अपघात जीवितहानी झाली नाही. गाडीतील 18 प्रवाशांपैकी अश्विनी गणेश भगत (वय 38), सचिन नवनाथ चिंचकर (43), श्रावणी भिमराव बिरादार (20), दानेश्वरी रमेश टाकवणे (22), अभिषेक वैभव बाबर (20) या पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना स्थानिकांच्या मदतीने कासार्डे येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉ. अनिरुद्ध मुद्राळे, चालक रूपेश राणे यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल रुपेश गुरव यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
Comments are closed.