Sindhudurg News – आषाढी एकादशीनिमित्त आशिये प्राथमिक शाळेत ग्रंथदिंडी उपक्रम, दुमदुमला “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा जयघोष

आनंददायी शनिवार अंतर्गत आषाढी एकादशीच्या औचित्याने कणकवली तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आशिये व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी उपक्रम साजरा केला. आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक लक्षवेधी वेशभूषा केली होती. विठ्ठल-रखुमाईची वेशभूषा मुलांनी साकारली. मुलांनी वारकरी संप्रदायातील पोशाखात सहभाग घेत वारीचे वातावरण निर्माण केले.
विद्यार्थ्यांनी एकादशीनिमित्त शाळेत सुंदर पालखी सजवली होती. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंग व अभंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. “ज्ञानोबा ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम” “विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्र भागेच्या तिरी विठ्ठल पाहिला” असा विठ्ठल नामाचा जयघोष करत सर्व परिसर भक्तिमय झाला. या कार्यक्रमात ‘वारीचे महत्त्व’, ‘एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक मूल्य’ यावर शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक शिल्पा सावंत, शिक्षिका नेहा मोरे, वृषाली मसुरकर, श्री.कदम, अंगणवाडी शिक्षिका तनया बाणे, मदतनिस पार्वती बाणे व अन्य पालकवर्ग व विद्यार्थी ग्रंथदिंडी मध्ये उपस्थित होते. मुख्याध्यापक शिल्पा सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वारीच्या परंपरेचे महत्त्व समजावून सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिकता, सामाजिकता आणि परंपरेबद्दल आदर निर्माण होतो. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव आणि सांस्कृतिक जागृती निर्माण झाली. आशिये जि.प.शाळा ते ग्रामपंचायत पर्यंत प्रभातफेरी काढत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed.