गायक-अभिनेता प्रशांत तमांग यांचे निधन झाले आहे.

‘इंडियन आयडॉल-3’चा विजेता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘इंडियन आयडॉल 3’चे विजेते प्रशांत तमांग यांचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झाले आहे. गायक आणि अभिनेता प्रशांत यांचे दिल्लीतील जनकपुरी येथील त्यांच्या घरी असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टी एका प्रतिभावान आणि कुशल कलाकाराच्या अचानक जाण्याने शोक व्यक्त करत आहे. प्रशांत यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रशांत यांचे संगीत क्षेत्रातील सहकारी भावेन धनक यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे प्रशांत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. इस्पितळात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रशांतच्या कुटुंबाला त्यांच्या निधनाने खूप धक्का बसला आहे. प्रशांतचे मित्र व चाहतेही या बातमीने दु:खी आहेत.

प्रशांत तमांग यांचा जन्म 4 जानेवारी 1983 रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झाला होता. 2007 मध्ये प्रशांतने इंडियन आयडॉल 3 या गायन रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्यांनी स्वत:ची प्रतिभा सिद्ध केल्याने त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले होते. ते घराघरात लोकप्रिय झाले. प्रशांत तमांग यांनी त्यांच्या प्रतिभेच्या बळावर शो जिंकला होता. ‘इंडियन आयडॉल 3’ जिंकल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलले. त्यांनी जगभरात सादरीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या भावपूर्ण आवाजाने आणि गायनाने सर्वांना मोहित केले. गायनासोबतच प्रशांत तमांग यांनी अभिनयातही नशीब आजमावले. ‘पाताल लोक’ या लोकप्रिय मालिकेतील दमदार अभिनयाचे त्यांचे खूप कौतुक झाले होते. त्यांनी अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम केले होते.

Comments are closed.