गायिका तीजन बाई यांचे निधन.
शासकीय सन्मानाने अंत्यविधी : पांडवानी गायनातील सुवर्णयुगाचा अंत
वृत्तसंस्था/ रायपूर
भारताच्या सर्वात प्रसिद्ध पांडवानी गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या तीजन बाई यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्या पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे भारतीय लोककला क्षेत्रासाठी रविवारची सुरुवात एका अत्यंत दु:खद बातमीने झाली. तीजन बाई बऱ्याच काळापासून आजारी होत्या. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पहाटे 3:15 वाजता वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलाविश्वातील त्यांचे योगदान सदैव अमर राहील, अशा शब्दात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय लोककलेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सरकारने तीजन बाई यांना अनेक प्रतिष्ठित नागरी सन्मानांनी गौरवले होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला होता. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
छत्तीसगडच्या लोककलेला जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या डॉ. तीजन बाई या ‘छत्तीसगडचा अभिमान’ होत्या. त्यांच्या निधनाने लोककलेच्या पांडवानी गायनातील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी अभिनयाने आणि अनोख्या शैलीने तीजन बाईंनी पांडवानी गायनाला देश-विदेशात एक नवी ओळख मिळवून दिली. जेव्हा त्या हातात तानपुरा घेऊन रंगमंचावर येत, तेव्हा महाभारतातील पात्रे जिवंत होत असत. त्या भारतीय लोकसंस्कृतीतील सर्वात आदरणीय कलाकारांपैकी एक होत्या.
Comments are closed.