सिंहगड रस्त्यावर बीमच्या पट्टीला पडली चर, वाहनचालकांचा बॅलन्स जाऊन अपघातांचा धोका
सिंहगड रस्त्यावर सिमेंटच्या रस्त्याच्या बीमची पट्टी खचली आहे. यामुळे दुचाकीचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून, बॅलन्स जाऊन लहान मोठ्या अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, हे बीम रस्त्याच्या समपातळीस आणण्याचे काम तत्काळ केले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडून शहरातील अनेक भागांत सिमेंटचे रस्ते केले आहेत. सिमेंटचे रस्ते केल्यानंतर रस्ता जिथे संपतो तिथे एक प्रकारचे सिमेंटचे बीम (पट्टी) टाकले जातात. त्यानंतर त्याला जोडून डांबरीकरण अथवा ब्लॉक टाकले जातात. सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटरदरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. तसेच राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू झाली आहेत. येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या प्रकल्प विभागाने साधारण पाच महिन्यांपूर्वी तानाजी मालुसरे स्मारक ते विठ्ठलवाडी यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नवीन पदपथ तयार केले आहेत. तसेच पदपथव सिमेंट काँक्रीटचा मुख्य रस्ता यादरम्यान सिमेंट ब्लॉक टाकून रस्तारुंदीकरण केले आहे. दरम्यान, विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्याची अवस्था वाईट आहे. सिमेंटचा रस्ता संपला की बीमला (पट्टी) लागून डांबरीकरण किंवा ब्लॉकचा रस्ता केला आहे. सिमेंट रस्त्याची पट्टी खचली असून तिला चर तयार झाली आहे. महापालिकेनेही दखल घेत दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत.
सिंहगड रस्त्यावरील सिमेंट रस्त्यावर खचलेले बीम रस्त्याच्या समपातळीवर आणण्याचे काम रात्रीत सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीपीटू पावडरमिक्स केमिकलचा वापर करून रस्ता समपातळीवर आणला जाईल. ब्रिज, रस्त्यांना भेगा पडल्यानंतर हे केमिकल वापरले जाते. – युवराज देशमुख, प्रकल्प विभागाचे प्रमुख, महापालिका
Comments are closed.