दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनला ‘सर’ किताबाचा मान, तब्बल 6 वर्षांनंतर एखाद्या क्रिकेटरला मिळाला हा सन्मान!

इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटू आणि कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांना ब्रिटिश शाही कुटुंबातील सदस्य प्रिन्सेस अ‍ॅन यांच्या हस्ते प्रतिष्ठित ‘नाइटहुड’ (Sir) हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सोहळा विंडसर कॅसल येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.

43 वर्षीय अँडरसन यांना हा मान माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या एप्रिल 2024च्या ‘रिजाइनेशन ऑनर्स लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ब्रिटिश सरकारकडून त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

विक्रमी कसोटी कारकीर्द

जेम्स अँडरसनने जुलै 2024 मध्ये लॉर्ड्स मैदानावर झालेल्या आपल्या शेवटच्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. तब्बल 21 वर्षांच्या लांब कारकिर्दीत त्यांनी 188 कसोटीत 704 बळी घेतले. जो जगातील कोणत्याही वेगवान गोलंदाजाचा सर्वाधिक विक्रम आहे. त्यांच्यापेक्षा जास्त बळी केवळ दोन स्पिनर्सनी घेतले आहेत- मुथैया मुरलीधरन (800) शेन वॉर्न (708)

याशिवाय, अँडरसनने एकदिवसीय सामन्यांत 269 बळी घेतले, जो इंग्लंडसाठी आजही विक्रम आहे. त्यांचा शेवटचा ODI सामना 2015 मध्ये झाला होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अँडरसनने 2024 च्या हंगामात लॅंकाशायर काउंटी संघासाठी खेळणे सुरू ठेवले. जवळपास दशकभरानंतर त्यांनी T20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्यांनी ‘द हंड्रेड’ स्पर्धेत मँचेस्टर ओरिजिनल्स संघासाठी वाइल्डकार्ड करार मिळवला होता. सध्या ते 2025 हंगामासाठी आपल्या काउंटी करिअरला पुढे नेण्याच्या चर्चेत आहेत.

विशेषत: 2019 मध्ये अँड्र्यू स्ट्रॉस यांच्यानंतर प्रथमच एखाद्या इंग्लिश क्रिकेटरला ‘नाइटहुड’चा मान मिळाला आहे.
जेम्स अँडरसन हे या प्रतिष्ठित सन्मानाने गौरवले जाणारे इंग्लंडचे 15वे क्रिकेटपटू ठरले आहेत.

Comments are closed.