मोहम्मद सिराजला मिळाला ‘हा’ पुरस्कार पण पुढचा प्रवास कठीण ठरणार! जाणून घ्या सविस्तर

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकत क्लीन स्वीप केला. त्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj) ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडण्यात आलं. सिराजने या मालिकेत एकूण 10 बळी घेतले.

सिराज म्हणाला, खरं सांगायचं तर ही मालिका माझ्यासाठी खूप छान गेली. अहमदाबादमध्ये खेळलो तेव्हा वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळाली. पण दिल्लीमध्ये आम्हाला बरीच षटके टाकावी लागली. मी घेतलेली प्रत्येक विकेट ही 5 विकेटसारखी वाटली. एक वेगवान गोलंदाज म्हणून मेहनतीनंतर जेव्हा फळ मिळतं, तेव्हा आत्मविश्वास वाढतो. ड्रेसिंग रूममध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’चा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही वेगळाच असतो.

नक्कीच, हा पुरस्कार आणि कामगिरी मालिकेसाठी आत्मविश्वास वाढवणारी आहे. पण आता मोठा प्रश्न असा आहे की, हा ‘इम्पॅक्ट’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत दिसेल का? कारण सिराजची वनडे संघात ही परतफेड लांब ब्रेकनंतर झाली आहे. हे बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’मुळे शक्य झालं. सिराजने शेवटचा वनडे सामना मागील वर्षी 7 ऑगस्ट रोजी कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यामुळेच ही मालिका सिराजसाठी नवं आव्हान ठरणार आहे.

सिराज पुढे म्हणाला, कसोटी क्रिकेट हा माझा आवडता फॉरमॅट आहे. कोणतीही उपलब्धी मिळाल्यावर मला व्यक्ती म्हणून खूप अभिमान वाटतो. मी पुढेही अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन. कसोटी क्रिकेट वेगळं असतं. दिवसभर मैदानावर राहावं लागतं, शारीरिक व मानसिक दोन्ही मेहनत घ्यावी लागते. यात अनेक आव्हाने असतात. पण याचमुळे मला अधिक अभिमान वाटतो.

बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, भारतीय विकेटकीपर-फलंदाज एन. जगदीशनने (N Jagdishan) ड्रेसिंग रूममध्ये सिराजला मेडल दिलं. सिराजचं कौतुक करताना तो म्हणाला, या मालिकेत अनेकांनी चांगली कामगिरी केली. पण एक खेळाडू असा होता ज्याने संपूर्ण मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केलं. त्याच्या प्रत्येक चेंडूत जोश, धैर्य आणि आक्रमकता होती. प्रत्येक वेळेस मैदानात उतरताना त्याचा दृष्टिकोन सारखाच राहिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा कोणी चांगलं खेळलं तेव्हा सर्वात आधी धावून जाऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांचं कौतुक करणारा खेळाडूही सिराजच होता.

Comments are closed.