अॅलंडमध्ये मतदानाच्या खटल्याची चौकशी करण्यासाठी बसा
राज्य सरकारचा आदेश : आयपीएस अधिकारी बी. के. सिंग यांच्यावर जबाबदारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या मुद्द्यावरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आवाज उठविला होता. आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. शनिवारी यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आळंद मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. 256 मध्ये येणाऱ्या भागातील 6,018 जणांची नावे बेकायदेशीरपणे मतदारयादीतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी आळंद पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अनेकवेळा विनंती केली तरी त्यांनी तपास करणाऱ्या सीआयडीला कोणतीही माहिती दिली नाही, असा आरोप काँग्रेसने केला होता. दरम्यान, मतचोरी प्रकरणासंबंधी तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सीआयडीच्या अधीक्षक शुभान्वित आणि सैदुल अदावत यांचाही एसआयटीमध्ये समावेश आहे. तपास केल्यानंतर एसआयटी राज्य सरकारकडे अहवाल सादर करेल.
राज्यातील आळंद विधानसभा मतदारसंघात मतचोरी झाली असून यासंबंधी तपास करणाऱ्या सीआयडीला केंद्रीय निवडणूक आयोगाने आठवडाभरात आवश्यक पुरावे द्यावेत, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. आयपी लॉग, 6108 मतदारांची नावे काढून टाकण्यासाठी अर्ज सादर करण्यास वापरलेल्या मोबाईलच्या ओटीपीसंदर्भात माहिती तपास अधिकाऱ्यांना द्यावी. अन्यथा मतचोरी करणाऱ्यांना संरक्षण पुरवत असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाल्यासारखे होईल, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.
Comments are closed.